मुंबई - साऊथ चित्रपटाचे निर्माते के मुरलीधरन यांचे निधन झाले आहे. तामिळनाडूतील कुंभकोणम येथील त्यांच्या गावी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मुरलीधरन हे तमिळ प्रोड्यूसर काउंसिलचे माजी अध्यक्षही होते. त्यांचे भागीदार, दिवंगत व्ही स्वामिनाथन आणि जी वेणुगोपाल यांच्या सहकार्याने त्यांनी लक्ष्मी मूव्ही मेकर्स हे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते ज्याद्वारे त्यांनी आंबे शिवम, पुधूपेट्टाई आणि बागवथी यांसारखे अनेक मोठे हिट चित्रपट दिले.
लक्ष्मी मूव्ही मेकर्सने तमिळ चित्रपटसृष्टीतील काही मोठ्या स्टार्ससह व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट दिले आहेत. के मुरलीधरन यांनी कमल हासन (अन्बे शिवम), विजयकांत (उलावथुराई), कार्तिक (गोकुलाथिल सेथाई), अजित (उन्नई थेडी), विजय (प्रियामुदन), धनुष (पुधुपेट्टाई) आणि सिम्बू (सिलमबट्टम) या ए-लिस्टर्स कलाकारांसोबत काम केले आहे.
एलएमएम निर्मित शेवटचा चित्रपट म्हणजे जयम रवी, त्रिशा आणि अंजली यांच्या प्रमुख भूमिका असलेला सकलाकला वल्लवन. है चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता.
के मुरलीधरन यांना कमल हसनने सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिलंय, "अनेक हिट चित्रपट देणारे लक्ष्मी मूव्ही मेकर्सचे निर्माता के आता राहिले नाहीत. प्रिय शिवा, मला ते दिवस आठवतात. त्यांना श्रद्धांजली."
के मुरलीधरन यांच्या निधनानंतर तमिळ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून अनेक दिग्गज कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञ त्यांना श्रध्दांजली वाहात आहेत.
हेही वाचा - शाहरुख खानने मक्कामध्ये केला उमराह, फोटो व्हायरल