मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद म्हणाली, मुस्लिम घर मालक आपल्याला मुंबईत कुठेही घर भाडेतत्त्वावर देत नाहीत. यासोबतच हिंदू घर मालकही आपल्याला घर देत नसल्याची खंत उर्फी जावेदने ट्विटच्या माध्यमातून मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत राहण्यासाठी उर्फी भाडेतत्त्वावर घर शोधत आहे. मात्र आपल्या कपड्यांमुळे आपल्याला कोणीही घर देत नसल्याचे उर्फीने ट्विटमधून सांगितले आहे. उर्फी जावेदने ट्विटच्या माध्यमातूनही खंत व्यक्त केल्यानंतर तिच्या फॅन्सकडून देखील यावर प्रतिक्रिया यायला सुरू झाली आहे. काही फॅन्सने तिच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी या ट्विट नंतर पुन्हा एकदा उर्फी जावेदची खिल्ली उडवली आहे.
चित्रा वाघ यांच्यासोबतचा वाद : उर्फी जावेदच्या कपड्यांवरून भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. उर्फी जावेदच्या कपड्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती बिघडत आहे. तिने आपल्या कपड्यांमध्ये बदल करावा नाहीतर ती भेटेल त्या ठिकाणी तिला झोडपून काढू असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला होता. यानंतर उर्फी जावेत हिने चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिसात आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. तसेच उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर वेळोवेळी ट्विट करून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता.
रूपाली चाकणकर यांनी केली पाठराखण : ऊर्फी जावेदच्या तक्रारीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक आरोप प्रत्यारोप देखील झाले. उर्फी जावेद हिच्या कपड्यांमुळे आधीच राजकीय वातावरण तापले होते. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या कपड्यांमुळे महाराष्ट्रात विकृती पसरत आहे, असा आरोप केला होता. या विकृतीला आताच थांबवणे गरजेचे आहे, असे म्हणत उर्फी जावेदला सरळ करण्याचा इशारा दिला होता. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी उर्फी जावेद हिची पाठराखण केली होती. कोणाला कोणते कपडे घालायचे आहेत हा ज्याचा त्याचा मूलभूत आधिकर आहे. याबाबत कोणी इतर ठरवू शकत नाही असे रूपाली चाकणकर म्हणाल्या होत्या.
कपड्यांमुळे घर मिळत नाही : पोलिसांनी ऊर्फी जावेद हिला सुरक्षा पुरवावी अश्या सूचना देखील दिल्या होत्या. ऊर्फी जावेदच्या कपड्यामुळे आधीच सुरू आलेल्या वादानंतर आता उर्फीने आपल्याला मुंबईत आपल्या कपड्यांमुळे घर मिळत नाही अशी खंत व्यक्त केली. त्यामुळे यावर आता पुन्हा एकदा वाद सुरू होण्याची शकत्या आहे. तिने केलेल्या ट्विटवर वापरकर्त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मत मांडले आहे.