मुंबई - शिवानी सुर्वे हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीत वावरणारी अभिनेत्री असून सध्या तिचे बॅक टू बॅक दोन चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. यामुळे ती खूप आनंदात आहे. मालिकांमध्ये एकसुरी भूमिका करताना येणारा कंटाळा अथवा सारखेपणा एक कलाकार म्हणून त्रासदायक असतो. त्यामुळे शिवानीने चित्रपटांतून विविधांगी भूमिका निवडल्या आणि त्याचं सोनं केलं. वर्षाच्या सुरुवातीला शिवानी अभिनित 'वाळवी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांनी तो डोक्यावर उचलून घेतला होता. परेश मोकाशी दिग्दर्शित व झी स्टुडिओज व मधुगंधा कुलकर्णी निर्मित ही डार्क कॉमेडी रहस्यमय रूपात मांडली होती आणि त्यातील नाविन्यतेने प्रेक्षकांना मोहित केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या सक्सेस पार्टीत आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी शिवानी सुर्वे बरोबर गप्पा मारल्या, त्यातील काही अंश.
'झिम्मा २' जोरात सुरु आहे. तुझ्या सहभागाबद्दल काय सांगशील?
'झिम्मा २' ला प्रेक्षकाचा जोरदार प्रतिसाद मिळतोय हे पाहून खूप छान वाटतंय. जेव्हा मला हा चित्रपट ऑफर झाला तेव्हा थोडं प्रेशर होतं. जेव्हा एखादा चित्रपट हिट होतो तेव्हा त्याच्या सिक्वेलमध्ये नव्याने एंट्री होत असेल तर जबाबदारी दुप्पट होते. आधीच्या भागातील पात्रे, ऍक्टर्स हे प्रेक्षकांच्या परिचयाचे झालेले असतात. पुढील भागात नव्यानं येणाऱ्या पात्राला प्रेक्षकांकडून पाठीवर थाप मिळवायला जास्त मेहनत करावी लागते. हे माहित असल्यामुळे 'झिम्मा २' मधील माझी भूमिका आव्हानात्मक होती असे म्हणायला वाव आहे. मला सांगण्यात आलं होतं की तू तुझी भूमिका अत्यंत सिरियसली कर. प्रेक्षकांना वाटले नाही पाहिजे की तू नव्याने या चित्रपटात आली आहेस. तुझ्या अदाकारीने प्रेक्षकांना असं वाटले पाहिजे की तू या गोष्टीचा सुरुवातीपासूनच भाग होतीस. हेमंत ढोमे याने माझी भूमिका इतक्या तरलतेनं आणि ताकतीनं लिहिली आहे ज्यामुळे ती साकारताना मला त्यात सहजात्मकता भरता आली.
या भूमिकेसाठी तू कशी तयारी केलीस?
मी 'झिम्मा'जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हाच पाहिला होता आणि मला अत्यंत आवडला होता. हा सिनेमा माझ्या मित्रांनी बनविलेला होता आणि यात काम करणारे सर्वच ओळखीचे होते. स्त्रीप्राधान्य चित्रपट फार कमी बनतात परंतु 'झिम्मा'ने स्त्रियांच्या भावविश्वात शिरून त्यांच्या अंतरंगातील गोष्टी लोकांसमोर ठेवल्या. प्रेक्षकांनीही त्याला भरभरून पाठिंबा दिला. झिम्मा जरी काही संदेश देत असला तरी त्यात मनोरंजन ठासून भरलेले होते. आणि त्यामुळेच त्याला प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले. मला वाटतं की अशाप्रकारचे सिनेमे अजून बनले पाहिजेत.
अर्थात जेव्हा मला 'झिम्मा २' बद्दल विचारणा झाली तेव्हा मला मनापासून आनंद झाला. हेमंतनं जेव्हा मला कथानक ऐकवलं तेव्हा मला ते खूप भावलंआणि माझ्या भूमिकेच्या प्रेमातच पडले. मी लगेच होकार दिला. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे थोडं दडपणही आलं. माझ्या भूमिकेला काही पंच लाईन्स वगैरे नाहीत, त्यामुळे ती भूमिका साकारताना तिचे भावविश्व जाणून घेणं गरजेचं होतं. मला खूप प्रश्न विचारायची सवय आहे. मी भूमिकेबद्दल हेमंतला खूप प्रश्न विचारले. आम्ही ऍक्टिंग वर्कशॉप्स केले. या सर्वांतून मला भूमिका समजण्यास उपयोग झाला आणि शूटच्या वेळेस माझ्या मनात काहीही शंका नव्हत्या. माझी भूमिका सिम्पल मुलीची असल्यामुळे हेमंतने मला मेक अप करण्यास मनाई केली होती.
विदाउट मेक अप काम करण्यासाठी मानसिक तयारी होती?
त्याची पण एक स्टोरी आहे. तसं बघायला गेलं तर शहरी मुली दररोज मेकअप करून वावरत असतात. मी एक अभिनेत्री आहे आणि मेक अप हा माझ्या प्रोफेशनचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जेव्हा मला सांगण्यात आलं की मला मेकअप न करता कॅमेरा फेस करायचा आहे तेव्हा मी इतकं सीरिअसली घेतलं नाही. शूटच्या पहिल्या दिवशी, कोणाला काय समजणार असे वाटून, हलकासा मेकअप करून सेटवर गेले. दिग्दर्शक काही बोलला नाही आणि माझे सीन्स पार पडले. हे चालतंय, असं वाटल्याने, मी दुसऱ्या दिवशीसुद्धा थोडासा मेकअप चढवून शॉट्स दिले. हेमंत तेव्हासुद्धा काही बोलला नाही. मला हायसं वाटलं. परंतु पॅक अप नंतर मला हेमंतचा लांबलचक मेसेज आला. त्यानं कळकळीने विनंती केली होती की, "कृपया थोडा सुद्धा मेकअप करू नकोस. माझ्या डोक्यात जे कॅरॅक्टर आहे ते अत्यंत साध्या मुलीचे आहे आणि त्याने भूमिकेला मेकअप शोभून दिसणार नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मेकअप करू नको. संपूर्ण चित्रपट बघितल्यावर तू मला थँक यू म्हणशील."
मला जाणीव झाली की आपण कुठेतरी चुकतो आहोत. आणि त्यानंतर मी एकाही शॉट ला मेकअप वापरला नाही. आणि पिक्चर बघितल्यावर जाणविले की हेमंत सांगत होता ते अचूक होते. विदाउट मेकअप मला मी आवडले. महत्वाचं म्हणजे विना मेकअप काम करण्याचा विश्वास वाढला. अर्थात मी त्याला मनापासून धन्यवाद दिले. तात्पर्य हे की नेहमी दिग्दर्शकावर विश्वास ठेवा.
तुझा याआधी प्रदर्शित झालेला 'वाळवी' देखील सुपरहिट ठरला होता. त्याबद्दल काय सांगशील?
वाळवी माझ्यासाठी लर्निंग एक्सपीरियन्स होता. तो माझा ड्रीम प्रोजेक्ट होता असेही म्हणता येईल. परेश मोकाशी सरांसोबत काम करायला मिळणे हे अनेक मराठी कलाकारांचे स्वप्न आहे. मला इतक्या लवकर त्यांच्यासोबत काम करायला मिळालं हे माझे भाग्य समजते. परेश सर खूप डिटेलमध्ये जाऊन काम करतात. प्रत्येक बाबतीत त्यांना परफेक्शन लागते. सुरुवातीला माझी घाबरगुंडी उडाली होती. मी तर त्यांना 'मला हा रोल करायला जमणार नाही' असं सांगितलं. परंतु त्यांनी मला समजावत सांगितलं की, 'तू ही भूमिका करू शकणार याची मला खात्री आहे. आणि त्यामुळेच तू इथे आहेस'. यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आणि मी जोमानं काम केलं. रीझल्ट तुमच्यासमोर आहे. माझी भूमिका ग्रे शेड कडे झुकणारी असली तरी एकंदरीत संपूर्ण कथानक उत्तम होतं. अशा प्रकारचा सिनेमा मराठीमध्ये बनतोय ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे.
हेही वाचा -
1. अजिंठा एलोरा चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव
2. रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' चित्रपटाची जगभरात झाली 700 कोटींची कमाई
3. प्रभासच्या 'सालार भाग 1 : सीझफायर'ला सेन्सॉर बोर्डाकडून मिळालं 'ए' प्रमाणपत्र