मुंबई - चित्रपट क्षेत्रात आता प्रादेशिक चित्रपट जास्त प्रसिध्दी मिळविताना दिसताहेत. चित्रपट हा भाषेच्या अडसरीशिवाय अनेक भाषिक लोकांचे मनोरंजन करू लागलाय. भाषेच्या मर्यादा ओलांडून मनोरंजन पॅन इंडिया होऊ लागलाय. अनेक सिनेमे एकाधिक भाषांमध्ये प्रदर्शित होऊ लागलेत. त्यामुळे त्या प्रत्येक सिनेमाची पोच वाढली आहे. आता झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत आणि हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होतोय. तो मराठी, हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेतही प्रदर्शित होणार आहे.गेल्या आठवड्यात या चित्रपटातील 'गुन गुन' हे मराठी गाणे प्रदर्शित केले गेले. महत्त्वाचं म्हणजे त्या गाण्याच्या तेलुगू, तामिळ मधील प्रतीही प्रदर्शित करण्यात आल्या. तेलुगु आणि तमिळ भाषेतील या गाण्याला त्या भाषेतील रसिकंनी उदंड प्रतिसाद दिल्याचे व्यूव्ह्ज वरुन दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत जंगल अवताडे यांनी केलं आहे. या चित्रपटातील 'गुन गुन' या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याने संगीत प्रेमींना प्रफुल्लित केले. समाज माध्यमांवर या ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून त्याची संख्या वाढतच आहे. या गाण्याने प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शनाआधीच आपलंस केलं आहे. अनेक प्रेमी युगुलं आपल्या प्री वेडिंग शूटसाठीही या गाण्याचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मराठीत या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना या गाण्याच्या तेलुगू आणि तामिळ भाषेतील प्रतींनाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'घर बंदूक बिरयानी' तेलुगूमधील 'गुन गुन' या गाण्याचे गीतकार आहेत चंद्रबोस, तर तामिळमधील गाण्याला शब्दबद्ध केले आहे युगभारती यांनी. या दोन्ही भाषेतील गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे संगीत लाभले असून त्याचे पार्श्वगायन केले आहे अनुराग कुलकर्णी आणि अदिती भावराजू यांनी. त्यांच्या जदुमयी आवाजाने या गाण्यातील प्रेमाची तरल भावना प्रभावीपणे समोर आली आहे. आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गीतात पहिल्या प्रेमाची चाहूल लागतानाची भावना प्रकट होताना दिसतेय.
या गाण्याचे संगीतकार ए व्ही प्रफुल्लचंद्र म्हणाले की, ''गुन गुन' हे गाणं मराठीत तर खूप श्रवणीय वाटतंच आहे परंतु तितकंच ते तेलुगू आणि तामिळ भाषेतही वाटतंय. एकच गाणं विविध भाषेत करतानाचा अनुभव खूप छान होता. मूळ चाल आणि गाण्यातून व्यक्त होणारी भावना ही तशीच आहे, भाषेत बदल आहे. गाण्याची चाल सारखीच असल्यामुळे त्यातील तरल भावनाही प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतील. त्यामुळे मराठीसह दाक्षिणात्य संगीतरसिकही या गाण्यावर फिदा होतील यात शंकाच नाही.'
मराठीमध्ये वैभव देशमुख यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी आवाज दिला आहे. तीनही भाषांमधील या गाण्याचे संगीतकार एकच आहेत, ते म्हणजे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र. 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी मराठी, हिंदी, तेलुगू आणि तामिळ अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - Virat Anushka In Ujjain : विरुष्काने घेतले बाबा महाकालचे दर्शन, केली 'ही' प्रार्थना