मुंबई : आपल्या देशात क्रिकेट हा धर्म समजला जातो. याची व्याप्ती इतकी मोठी आहे की लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत हा खेळ पोहोचला आहे. गेल्या दशकापासून महिलाही मोठ्या संख्येने या खेळाचा रोमांच अनुभवताना दिसतात. जेव्हापासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जन्माला आली तेव्हापासून त्याची लोकप्रियता वाढतच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड देखील त्यासुमारास आंतरराषट्रीय लढती ठेवत नाही कारण यातून मिळणारे उत्पन्न. जगभरातील अब्जावधी लोक आयपीएल फॉलो करतात आणि अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू ती खेळण्यासाठी भारतात येणास उत्सुक असतात. कारण यातून होणारी कमाई. या स्पर्धेने उत्पन्नाचे अनेक विक्रम मोडले असून या लीगकडे अनेक ब्रॅण्ड्स तगडी रक्कम मोजून आपले प्रॉडक्ट्स प्रोमोट करतात. तर आयपीएल हे जनसामांन्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असे अनेकांना वाटते.
क्रिकेट टीम्स याचा हिस्सा : नुकतीच आयपीएल ची स्पर्धा सुरु झाली असून अनेक क्रिकेट टीम्स याचा हिस्सा आहेत. यात भर पडली आणखी एका टीमची ती म्हणजे टीम ‘सर्किट’. आयपीएल आणि टीम सर्किट एकत्र आले ते एका प्री मॅच सेशनमध्ये आणि त्यावेळी चित्रपटाचा नायक वैभव तत्त्ववादीने लाईव्ह मॅचची कॉमेंट्रीदेखील केली. ‘सर्किट’ हा पहिला चित्रपट ठरला, आयपीएलमध्ये प्रमोशन करणारा. प्री मॅच सेशनमध्ये अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी माजी क्रिकेटपटू किरण मोरे आणि मराठी निवेदिका पूर्वी भावे यांच्याशी क्रिकेट आणि त्यांचा चित्रपट सर्किट विषयी संवाद साधला. या गप्पा मारताना एक अनोखे साम्य समोर आले ते म्हणजे किरण मोरे, वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे या तिघांचाही जन्म सप्टेंबर महिन्यातील आहे. हे कळल्यावर गप्पांना अधिकच रंग चढला. गप्पा मारत मारत उपस्थितांना सर्किटचा ट्रेलरही दाखवण्यात आला, जो पाहून सर्वांनी त्याची स्तुती केली. हा अनुभव कायम लक्षात राहील असे वैभव आणि हृता म्हणाले. त्यांनी हेही कबूल केलं की सुरुवातीला त्यांना थोडे थोडे दडपण वाटत होते परंतु नंतर मजा आली.
७ एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित : ‘सर्किट‘ ची निर्मिती मधुर भांडारकर यांच्यासोबतच पराग मेहता, अमित डोगरा आणि प्रभाकर परब यांनी केली आहे, अनुक्रमे भांडारकर एंटरटेन्मेंट, फिनिक्स प्रॉडक्शन आणि देवी सातेरी प्रॉडक्शन या बॅनर्स खाली. सचिन नारकर, विकास पवार, अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातून आकाश पेंढारकर यांनी दिग्दर्शकीय पदार्पण केले असून ‘सर्किट’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा : Raveena Tandon reached Ujjain : रवीना टंडन पोहोचली उज्जैनला; घेतले महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन