मुंबई - अभिनेते देवेंद्र गायकवाड लिखित-दिग्दर्शित 'चौक' मध्ये अनेक कलाकार हटके भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे बऱ्याच काळानंतर मराठी प्रेक्षकांना मल्टिस्टारर बघायला मिळणार आहे. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर हे कलाकार चौक मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील. या अभिनय श्रेय नामावलीवरून लगेच कल्पना येते की 'चौक' नेहमीच गजबजलेला राहील. नुकतेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. त्यातील 'एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, ‘वाघ आहे वाघ’ हे संवाद सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि त्यातून सिनेमाची जातकुळी कळते. हा टिझर प्रदर्शित झाल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
चौकचा रंजक टिझर - या टिझर मध्ये सुरुवातीलाच गर्दी दिसत असून चौकात गर्दी असणे स्वाभाविक आहे. अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये चौक आणि सार्वजनिक कार्यक्रम यांचं घट्ट नातं असतं. त्या गर्दीतल्या प्रत्येकाला तो चौक फक्त आपला आहे असे वाटत असते. खासकरून गणेशोत्सवात चौकात प्रफुल्लित करणारं वातावरण असतं. सार्वजनिक उत्सव म्हटलं की मैत्री आली, वैर आलं, वादविवाद आले, चर्चा आली. हे सर्व चौक या चित्रपटातून दर्शवण्यात आले असून अजूनही नाट्यमयता त्यातून अनुभवायला मिळेल असे दिग्दर्शक सांगतो.
देवेंद्र गायकवाड यांचा चौक - दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड हा निर्माता दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे यांच्या तालमीत टाऊन सुलाखून निघालेला आहे. त्याच्या चित्रपटातून रांगडेपणा आवर्जून दिसतोय. त्याने या चित्रपटाची गोष्ट मांडताना सामाजिक विषयांनाही हात घातला आहे. त्यामुळेच चौक मनोरंजनासोबत एक विचार सुद्धा मांडताना दिसेल असे त्याचे म्हणणे आहे. अभिनेता म्हणून यापूर्वी देवेंद्र गायकवाड ने देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी यातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे.
कलाकारांची मांदियाळी - या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद देवेंद्र गायकवाड यानेच लिहिले असून चौक द्वारे त्याचे दिग्दर्शन पदार्पण होत आहे. या चित्रपटात प्रविण तरडे त्यांच्या रांगड्या शैलीत दिसतील तर रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येईल. राष्ट्रीय पुरस्कार विजेता उपेंद्र लिमये भाईगिरी अंदाजात दिसेल तर स्नेहल तरडे व संस्कृती बालगुडे या भावनिक प्रसंगांत प्रेक्षकांना बांधून ठेवतील. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता किरण गायकवाड मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय आणि तो तरुण नेत्याची भूमिका साकारताना दिसेल. ही सर्व पात्र जरी निरनिराळ्या ठिकाणचं प्रतिनिधित्व करीत असली तरी ती सर्व या चौकात येऊन एकमेकांसमोर उभे ठाकतील आणि त्यातून निर्माण होणारे नाट्य प्रेक्षकांना नक्की आवडेल असे निर्माते सांगतात.
अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी ‘चौक’ ची निर्मिती केली असून, दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे देवेंद्र गायकवाड याने.
हेही वाचा - Santosh Juvekar : संतोष जुवेकर प्रथमच ऐतिहासिक चित्रपटात, 'रावरंभा' मध्ये साकारतोय 'जालिंदर'...