मुंबई - Suspense Thriller Sapala : मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी विषय आणि जॉनर्स हाताळले जातात, यामध्ये सस्पेन्स थ्रिलर जॉनर फारसा बघायला मिळत नाही. ती कमी भरून काढण्यासाठी येतोय 'सापळा' हा चित्रपट. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'सापळा' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून त्याचा टीझर नुकताच प्रकाशित करण्यात आला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
निखिल लांजेकर दिग्दर्शित 'सापळा'ची कथा, पटकथा व संवाद श्रीनिवास भणगे यांचे आहेत. चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांची आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले की, "एक फिल्ममेकर म्हणून मी चांगल्या कथांच्या शोधात असतो. त्यातच सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर माझ्या आवडीचा आहे. मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता वाचनात आली. हे कथानक समयोचित असून त्याची आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत प्रेझेंट करीत आहे आणि ते प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे."
ते पुढे म्हणाले की, "याचे पुनर्लेखन दिगपाल लांजेकर यांनी केलेले असून पटकथा आणि संवाद आजच्या काळातील वाटतील याची खबरदारी घेण्यात आली आहे. समकालीन आणि कालातीत अशा दोन्हीचा एक आगळा असा मिलाफ यात साधला गेला असून प्रेक्षकांना अचंबित करणारा अनुभव हा चित्रपट देईल. मराठी साहित्याचा उत्तम नमुना मला गवसला याचा मला अभिमान आहे."
चित्रपटाचा टीझर खूपच उत्कंठावर्धक आहे. यामध्ये चिन्मय मांडलेकर अतिशय वेगळ्या अवतारात दिसत असून त्याची एनट्रीच दहशत निर्माण करणारी आहे. समीर धर्माधिकारीही एका अनोख्या भूमिकेत दिसत आहे. नेहा जोशीही यामध्ये एक गूढ पात्र साकारत आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'सापळा' हा आगामी मराठी चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा -