मुंबई - रुपेरी पडद्यासह ओटीटीवर आपला जलवा दाखवणारी सदाबहार अभिनेत्री तमन्ना भाटिया आता नव्या जबरदस्त चित्रपटासाठी सज्ज होत आहे. पॅन-इंडिया अभिनेत्री म्हणून सध्या टॉप लिस्टवर असलेली तमन्ना जॉन अब्राहमसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तमन्ना आणि जॉन अब्राहमच्या चाहत्यांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे. या दोन प्रतिभावान कलाकारांना एकत्र काम करताना पाहणे ही एक प्रकारची ट्रीट असणार आहे.
तमन्ना अलिकडे विजय वर्मासोबतच्या रिलेशनशीपच्या बातम्यांमुळे चर्चेत असते. लस्ट स्टोरीज २ चित्रपट ओटीटीवर स्ट्रिमिंग झाल्यानंतर दोघांची ऑन स्क्रिन केमेस्ट्रीही जबरदस्त पाहायला मिळाली. त्या अगोदर जी करदामधील तिच्या अभिनयाचे भरपूर कौतुक झाले होते. त्यापूर्वी तिने बबली बाऊन्सरमध्ये केलेल्या अभिनयाचेही कौतुक झाले. तमन्ना भाटिया आगामी जेलर, भोला शंकर या दाक्षिणात्य चित्रपटातून भूमिका साकारणार आहे.
जॉन अब्राहम पठाणमधील राकट भूमिकेमुळे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपली जादु दाखवून गेला. यात त्याने शाहरुख खानच्या विरुद्ध साकारलेला दणकट खलनायक असजूनही लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे त्याचा आगामी चित्रपट कोणता असेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर त्याने तमन्ना भाटियासोबत आगामी चित्रपटात भूमिका स्वीकारली आहे.
जॉन अब्राहम आणि तमन्ना भाटिया यांच्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निखील अडवाणी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अलिकडेच अडवाणी यांनी मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे हा चित्रपट बनवला होता. त्यांनी बनवलेल्या बाटला हाऊस, सत्यमेव जयते आणि सत्यमेव जयते २ मध्ये जॉन अब्राहम होता. निखील अडवणी यांच्या नावावर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून डी डे, पतियाला हाऊस, हिरो, लखनौ सेंट्रल, सरदार का ग्रँडसन, बेल बॉटम, एअरलिफ्ट यासारखे २५ च्यावर चित्रपट आहेत. अशा प्रकारे तमन्ना भाटिया, जॉन अब्राहम आणि निखील अडवाणी हे त्रिकुट आगामी चित्रपटात धमाल करेल याबाबत कोणतीही शंका नाही. या चित्रपटाची कथा व इतर कलाकार याबद्दलचा तपशील अद्यापही गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा -
१. OMG 2 : अक्षय कुमारचा चित्रपट 'ओ माय गॉड २' वादाच्या भोवऱ्यात, सेन्सॉर बोर्डची समिती करणार परीक्षण