मुंबई : गुरुदासपूरचा खासदार असलेल्या सनी देओलने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्याने याविषयी एका मुलाखतीत सांगितले आहे की, 'गदर-२' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर सनी देओलने राजकारण सोडून चित्रपट अभिनेता म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ ची निवडणूक लढवणार नसल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. सनी देओल हा २०१९ मध्ये गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरला होता. विनोद खन्ना यांच्याप्रमाणे तो समाजाच्या विकासासाठी काहीतरी वेगळे करणार, अशी अपेक्षा लोकांनी केली होती. सनी देओलने निवडणूक प्रचारादरम्यान लोकसभा मतदारसंघातील जनतेला मोठमोठी आश्वासनेही दिली होती. त्यामुळेच गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून तो विजयी झाला होता. गुरुदासपूरच्या लोकांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होती.
गुरुदासपूरची जनता सनी देओलवर भडकली : सनी देओलच्या अशा वृत्तीमुळे गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील लोकांमध्ये त्याच्याबद्दल प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. गुरदासपूरचा तरुण अमरजोत सिंग आणि शेतकरी नेते इंद्रपाल सिंग बैंस यांनी अनेकवेळा सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स शहरात लावली होती. कारण सनी देओलने निवडणुकीच्या आधी लोकांना अनेक आश्वासनं दिली होती. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. मतदार संघातील जनता त्यावेळी देखील खूप भडकली होती. जवळपास ४ वर्षांपासून तो मतदारसंघात आला नाही. याशिवाय तो संसदेत अधिवेशनातही गैरहजर राहिला.
सरकारी सुविधा काढून घ्या : ओम बिर्ला यांनी शासनाला पत्र लिहून ही मागणी केली होती की, खासदार सनी देओलची लोकसभा सदस्यता आणि शासकीय निवासस्थानासह सर्व सरकारी सुविधा काढून घ्याव्यात याशिवाय त्यांचा पगार आणि सरकारी भत्ते थांबवावेत असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. दरम्यान आता सनी देओल हा कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत आहे. त्यानंतर आता सनीने मुलाखती दरम्यान सांगितले की, 'जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला तेव्हा मला वाटले होते की, चांगल्या गोष्टी घडतील. पण मी एक अभिनेता म्हणून त्या गोष्टी करू शकतो. कारण मला लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. असे त्याने सांगितले.
सनी देओल करणार देशसेवा : सनी देओलने पुढे म्हटले की, 'एक अभिनेता म्हणून मला जे वाटेल ते मी करू शकतो. मला राजकारणात जे करायचे नाही, ते मला करावे लागले तर ते मला सहन होणार नाही. जेव्हा गोष्टी बरोबर दिसत नाहीत तेव्हा मला दुसरीकडे जावंसं वाटतं. आता मी २०२४ मध्ये कोणतीही निवडणूक लढवणार नाही. अभिनेता म्हणून माझी ओळख कायम राहील. मी यापुढेही अशीच देशसेवा करत राहीन. मला खात्री आहे की एक अभिनेता म्हणून मी तरुणांची आणि देशाची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकेन'. सनी देओलने पुढे सांगितले की, राजकारण आपल्या कुटुंबाला शोभत नाही. जर मी आता २०२४ ची निवडणूक लढवण्यास माझ्या वडिलांना (धर्मेंद्र) सांगितले तर तेही निवडणूक लढवण्यास नकार देतील. मी राजकारण करू शकत नाही आणि करू इच्छित नाही. माझ्या वडिलांची पण तीच इच्छा आहे', असे सनी देओलने मुलाखतीत सांगितले.
हेही वाचा :