मुंबई - करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेले अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांचे पुन्हा एकत्र येणं चर्चेचा विषय बनलाय. बॉलिवूड निर्माता रमेश तौरानी यांनी मुंबईत दिवाळी निमित्त पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये सिद्धार्थ आणि वरुण यांचे पुनर्मिलन झालं आणि त्यांचे चाहते नॉस्टॅल्जिक झाले. दोघेही या पार्टीत मजा मस्ती करताना, पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसले. सिद्धार्थ एका काळ्या कुर्त्याच्या सुंदर एम्ब्रॉयडरी जॅकेटसह मॅचिंग असलेल्या सेटमध्ये आला होता, तर वरुण धवननं पेस्टल ब्लू प्रिंटेड कुर्ता आणि ऑफ-व्हाइट ट्राउझर्समध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
करण जोहरने 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्टला लॉन्च केलं. प्रेम आणि मैत्रीबद्दलचा हा चित्रपट तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय ठरला. या चित्रपटात वरुण धवन एका श्रीमंत घरच्या, लाडाने काहीसा वाया गेलेल्या तरुणाची भूमिका केली होती. तर सिद्धार्थनं मेहनती, आत्मविश्वास असलेल्या प्रामाणिक होतकरु तरुणाची भूमिका साकारली होती. दोघांचंही पदार्पण वाजत गाजत झालं आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. दोघांच्याही नावावर अनेक यशस्वी हिट चित्रपट जमा आहेत. अनेक पुरस्कारही त्यांनी मिळवलेत.
कामाचा विचार करता वरुण धवन ग्लोबल मालिका 'सिटाडेल'च्या भारतीय आवृत्तीमध्ये आघाडीच्या नायकाची भूमिका साकारतोय. यामध्ये तो समंथा रुथ प्रभूसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. ही मालिका त्याच नावाच्या रुसो ब्रदर्सच्या मालिकेचे भारतीय रूपांतर आहे. प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडेन यांनी मूळ मालिकेमध्ये आघाडीच्या भूमिका साकारल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक राज आणि डीके यांनी भारतीय आवृत्ती तयार केली आहे.
दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आगामी 'योद्धा' या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय, तो आगामी वेब सिरीज 'इंडियन पोलिस फोर्स'मधून डिजिटल पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. रोहित शेट्टी दिग्दर्शित या मालिकेत विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका अमेझॉन पार्ईम व्हिडिओ या ओटीटीवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा -
2. Katrina Kaif : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानंतर कतरिना कैफ 'मॉर्फ'च्या जाळ्यात
3. Nagpur Crime : उपराजधानीत 84 जिवंत काडतुसांसह नऊ पिस्तुल जप्त, दोन तस्करांना ठोकल्या बेड्या