मुंबई : सध्या सोशल मीडियावर ‘रील्स’ ने धुमाकूळ घातला आहे. सामान्यजनांपासून सेलिब्रिटीज पर्यंत सर्व रील्स करत आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. अजय -अतुल यांच्या दमदार संगीताचीदेखील चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर 'चंद्रा' या गाण्याच्या नृत्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. अमृता खानविलकरने ज्याप्रमाणे 'चंद्रा' प्रेक्षकांसमोर सादर केली त्याला तोड नाही. तिची ही अदा पाहून सामान्य प्रेक्षक तर सोडाच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही 'चंद्रा'वर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील नुकताच सोशल मिडियावर 'चंद्रा'चा नृत्य व्हिडिओ शेअर केला ( Sonali Kulkarni Chandamukhi Dance ) असून 'लावणीच्या प्रेमाखातर' असे कॅप्शन देत 'प्लॅनेट मराठी' आणि 'चंद्रमुखी' या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर सोनाली कुलकर्णी म्हणाली, ''लावणीच्या प्रेमाखातर आणि त्याचबरोबर 'हिरकणी' टीम विशेषतः प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे यांच्या प्रेमाखातर हा 'चंद्रा'वर नाचण्याचा मी प्रयत्न केला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा.''
29 एप्रिलला होणार प्रदर्शित
‘चंद्रमुखी’ या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे, तर चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. ‘चंद्रमुखी' येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हेही वाचा - लोककारणी आनंद दिघे यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक, ‘धर्मवीर मु.पो. ठाणे' चित्रपटात!