मुंबई - वर्षभरात निरनिराळे ‘डे’ साजरे होत असतात त्यातील एक आणि महत्वाचा म्हणजे ‘फादर्स डे’ ( Fathers Day ). खरंतर मुलांच्या संगोपनात सर्वात जास्त महत्व आईला दिले गेले असले तरी वडिलांचाही तेवढेच महत्व असते हे फारसे अधोरेखित केले गेलेले नाही. कुटुंबातील महत्वाचा घटक असलेले वडील नेहमीच मूकपणे मुलांना उत्तमरीत्या वाढविण्याच्या प्रक्रियेत सामील असतात. बरेचसे वडील मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करत नाहीत म्हणून मुलांच्या संगोपनात त्यांच्या योगदानाबद्दल फारसे कुणाला माहित नसते. पण, प्रत्येक मुलाला आईबरोबरच वडिलांचे प्रेमही हवे असते. बदलत्या काळात अनेक सामाजिक स्थित्यंतरे घडत आली आहेत. ज्यात ‘सिंगल पॅरेंटिंग’ ( Single Parenting ) सुद्धा दिसून येते.
बहुसंख्य लोकांचा, असा विश्वास आहे की मातृत्व आणि पालकत्व स्त्रियांना नैसर्गिकरित्या येते. पण, एकल पालकांचे, विशेषत: अविवाहित वडिलांचे काय? पालकत्त्व हे कठीण काम आहे. अलिकडच्या काळात, पुरुष मुलांचे संगोपन करण्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांनी दाखवून दिले आहे की ते देखील त्यांच्या मुलांचे संगोपन उत्तमरीत्या करू शकतात. काही बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील ‘सिंगल फादर’ ( Single Father ) असण्याची भूमिका घेतली आहे आणि नजीकच्या भविष्यात पितृत्त्व स्वीकारू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक उदाहरण मांडून ठेवले आहे. बॉलिवूडविश्वात अनेक एकल वडील पालक दिसून येतात. काहींचे घटस्फोट झाले म्हणून, काहींची पत्नी मरण पावल्या म्हणून तर काहींना लग्न न करताच पालकत्व स्वीकारायचे होते म्हणून.
करण जोहर - करण जोहर हा एक प्रसिद्ध सेलेब्रिटी. प्रथितयश निर्माता आणि दिग्दर्शक आहे. असेही म्हटले जाते की सध्या बहुतांश सिनेइंडस्ट्री त्याच्या इशाऱ्यावर चालते. पण, तो कोणाच्या इशाऱ्यावर चालतो, तर त्याची दोन मुले, रुही आणि यश. ही जुळी बहीण-भाऊ ‘सरोगसी’ ( Surrogacy ) मधून जन्माला आली. कारण जोहरला कोणत्याही स्त्रीमध्ये रस नसल्यामुळे तसेच पालकत्वाची भावना उमलून आल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. त्याच्या मते त्याच्या मुलांच्या आगमनानंतर त्याच्यात अनेक सकारत्मक बदल घडले आणि आता त्याचे संपूर्ण आयुष्य केवळ आपल्या दोन्ही मुलांभोवती फिरते. त्याचा अत्यंत जवळचा मित्र सुपरस्टार शाहरुख खानने ( Shahrukh Khan ) आपले तिसरे अपत्य ‘सरोगसी’ च्या माध्यमातून जन्माला आणल्यानंतर करण ने पालकत्वाचा निर्णय घेतला. तो नेहमी म्हणतो, ‘मस्त चाललंय आमचं’!
राहुल देव - हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आदी भाषांमधून अभिनय करणारा नट म्हणजे राहुल देव ( Rahul Dev ). आपली बायको रिना हिचे कर्करोगाने निधन झाल्यावर त्यांचा मुलगा सिद्धार्थचा तो एकल पालक म्हणून संगोपन करत आहे. अर्थात ‘फॅशन’ चित्रपटातून उदयास आलेली मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसे आणि राहुल देव रिलेशनशिपमध्ये असून ते एकत्र राहत आहेत.
चंद्रचूर सिंग - गुलझार दिग्दर्शित ‘माचीस’ मधून नावारूपास आलेला अभिनेता चंद्रचूर सिंग ( Chandrachur Singh ) हा देखील एकल पित्याची भूमिका निभावत आहे. त्याचे लग्न अवंतिका कुमारी सोबत झाले होते. पण, आता ते एकत्र राहत नाहीत आणि चंद्रचूर सिंग त्यांचा मुलगा श्रानजयचा एकल पिता म्हणून योग्यरितीने सांभाळ करत आहे.
राहुल बोस - एकल पालक बनण्यासाठी ‘सरोगसी’ वगैरेचा मार्ग न अवलंबता अभिनेता राहुल बोसने दत्तक प्रक्रियेचा मार्ग अवलंबिला. त्याने कायदेशीररित्या अंदमान-निकोबार येथील सहा मुलांना दत्तक घेतले असून तो प्रतिमा, रुखसार, मात्रेना, बिंदू, जीनू आणि अनिमेश यांचा एकल वडील म्हणून सांभाळ करतो. ते सर्व 11 वर्षांचे असून आपले वडील राहुल बोस ( Rahul Bose ) सोबत आनंदात जीवन जगताहेत. घटस्फोटामुळे कमल हसन, ह्रितिक रोशन, अर्जुन रामपाल, फरहान अख्तर हेदेखील ‘सिंगल फादर्स’ च्या श्रेणीत मोडतात.
हेही वाचा - फादर्स डे 2022: चित्रपटांमधील वडील ज्यांनी रूढीवादी परंपरांच्या विरोधात आपल्या मुलींना पाठबळ दिले