मुंबई - Sadanand Kundar : 'एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा. लि. चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांना 'आयसीटी' मुंबई आणि 'द कलर सोसायटी' यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिषदेत कलर इंडस्ट्रीतील प्रतिष्ठेच्या 'जीवनगौरव पुरस्कारानं मुंबई येथे सन्मानित करण्यात आलं. कुंदर यांना 'पेंट' उद्योग क्षेत्रातील भरीव कार्यासाठी हा पुरस्कार 'पद्मभूषण' विजेते उद्योजक जे.बी. जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदानंद कुंदर यांना 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान : रंगनिर्मिती उद्योग क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान केला जातो. यापूर्वी एशियन पेंट्स चे अश्वीन दाणी, कॅमलीन चे सुभाष दांडेकर अशा काही मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सदानंद कुंदर यांच्या पेंट क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदानांबद्दल त्यांना हा विशेष प्रेरणादायी 'जीवनगौरव पुरस्कार' दिला गेला. 1981मध्ये, मिसरुड फुटलेला किशोरवयीन मुलगा घरच्या आर्थिक अडचणींमुळे उडुपीहून मुंबईत आला. याच मुलाने नंतर उद्योगक्षेत्रात स्वतःचा डंका वाजवला आणि सदानंद कुंदर हे नाव रंगनिर्मीतीच्या प्रांतात आदरानं घेतलं जाऊ लागलं. सुरुवातीला त्यांनी 9/- रुपये रोजंदारीवर कनिष्ठ पेंट पर्यवेक्षक म्हणून काम सुरू केलं. 1984 मध्ये स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करून घोडबंदर, ठाणे येथील शिपयार्ड कंपनीचे पहिले कंत्राट मिळविण्यात ते यशस्वी झाले.
सदानंद कुंदर यांनी केल्या भावना व्यक्त : माझगाव डॉक लिमिटेड, एल अँड टी, चौगुले ग्रुप, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून त्यांना प्राधान्य दिलं जातं. सदानंद कुंदर यांना हा पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं, ''पेंट उत्पादन क्षेत्रात मी केलेल्या कार्याची दखल घेऊन मला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी ऋणी आहे. नव्या भारताच्या विकासात भरीव योगदान देण्याऱ्या तरुण उद्योजकांसाठी माझा अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरेल, त्यातून भावी प्रतिभावंत उद्योजक या क्षेत्राला लाभतील अशी मला आशा आहे.''
हेही वाचा :