मुंबई - खरं म्हणजे मदर्स डे म्हणजेच मातृदिन साजरा करणे हे विदेशी चोचले आहेत. अर्थात अर्थशास्त्रातील 'डेमॉनस्ट्रेशन इफेक्ट' या नियमाप्रमाणे आपण विकसनशील राष्ट्र असल्यामुळें पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण करतो. असो. तर आपणही अनेक डेज पाळतो. रविवारी मदर्स डे साजरा केला गेला. अनेक सेलिब्रिटीजनी आपले किस्से सांगत त्यांच्या जीवनातील त्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. काहींनी आपले काम आईला, मदर्स डे ला, समर्पित केले. पिकल म्युझिक ही अल्पावधीत नावारूपाला आलेली म्युझिक कंपनी. त्यांनी एक नवीन सिंगल 'आईच्या माघारी' मातृदिनाचे औचित्य साधत प्रदर्शित केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
आईची महती सांगणारे गाणे 'आईच्या माघारी' - तसं बघायला गेलं तर आपल्या देशात आई देवाचे रूप मानले जाते. देव एकाचवेळी सर्व ठिकाणी असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली असे म्हटले जाते. आई ही प्रत्येक अपत्यासाठी देवच असते. आईची महती काय वर्णावी, ती प्रत्येकालाच ठाऊक आहे. देवाने आपल्या ठायी असलेल्या सर्व गुणांचा समावेश करून आई घडवली अशी धारणा आहे. देवाचं मूर्त रूप असलेली आई आपल्या मुलांच्या मागे सावलीप्रमाणे उभी असते. आता देव श्रेष्ठ की आई हे ज्याने त्याने ठरवावे. समर्थ रामदासांनी लिहूनच ठेवले आहे की स्वामी तिन्ही जगाचा पण आईविना भिकारी. याच आईची महती सांगणारे गाणे 'आईच्या माघारी' मातृदिनाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आले.
गाण्याची सुरेल चाल - आईची माया ही नेहमीच हृदयात दडलेली असते. अगदी ती गेल्यानंतर ही तिच्या मायेचा पदर अनुभवता येतो, दृश्य-अदृश्य स्वरूपात. या गाण्यातून आईचे असणे आणि नसणे याचा भावार्थ अधोरेखित केला गेला आहे. मुलांना आईची माया नेहमीच मिळत असते परंतु लग्न करून गेलेल्या मुलीला तिची उणीव अधिक भासत असते. हीच उत्कटता या गाण्यातून प्रतीत करताना पश्चिमात्य नृत्यशैलीचा छान वापर करण्यात आला आहे. किंबहुना ती शैली अधिक भावपूर्ण कवितेचे बोल अधिक त्याला दिलेली उत्कृष्ट चाल अधिक सुरेल गायन यांचे संमिश्रण म्हणजे हे गाणं.
पिकल म्यूझिकचे गाणे - समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी त्यांच्या पिकल म्युझिकच्या माध्यमातून 'आईच्या माघारी' हे गाणं आणलं आहे. महेश आफळे, ज्यांना प्रिन्स म्हणूनही ओळखले जाते, यांची 'प्रतिमांतर' मधील कवितेला चाल लावून हे गाणं अस्तित्वात आलं आहे. संगीतकार मयुरेश अधिकारी यांनी या गाण्याला दिलेली चाल हृदयस्पर्शी आहे. कवितेतील आर्तता गायिका लायला यांनी परिणामकारकरित्या प्रेरित केली आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सोनालिसा ने केले असून या म्युझिक व्हिडिओ चे दिग्दर्शन नितीश बुधकर यांनी केलं आहे. द मीडिया हाऊसच्या मयूर रेवाळे, ऋषिकेश गावडे, विक्रांत चिकणे, वैभव चिकणे, सूर्यकांत गोठणकर यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. लायला व मयूरेश अधिकारी यांनी वुडस्टॅाक स्टुडिओजच्या बॅनरखाली 'आईच्या माघारी' या गाण्याची निर्मीती केली आहे.
हेही वाचा - Parineeti Raghav Engagement : परिणीती-राघव यांचा साखरपुडा संपन्न; पाहा फोटो अन् व्हिडिओ