मुंबई - पुनीत बालन सेलिब्रिटी लीग (PBCL) या कलाकारांच्या क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या सीजनचा लीलाव १०० हून अधिक सेलिब्रिटिंच्या उपस्थितीत, मुंबई येथे ताज हॉटेलमध्ये पार पडला. पीबिसीएलच्या (PBCL) अंतिम विजेत्यांना जो चषक दिला जाणार आहे, त्याचे अनावरण राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड, जान्हवी धारीवाल बालन आणि महेश मांजरेकर, शरद केळकर, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, सुबोध भावे आणि पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सातव यांनी केले. प्रास्ताविक पीबीसीएलचे प्रवर्तक पुनीत बालन यांनी केले आणि राहुल क्षीरसागर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा लिलाव पार पाडला.
११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत ही स्पर्धा पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत ६ संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघामध्ये १६ नामवंत कलाकारांचा सहभाग असेल. यामध्ये तोरणा लायन्स या संघाचं नेतृत्व पुनीत बालन, रायगड पँथर्स या संघाचे नेतृत्व प्रवीण तरडे, शिवनेरी रॉयल्स या संघाचे नेतृत्व सुबोध भावे, सिंहगड स्ट्रायकर्स या संघाचे नेतृत्व सिद्धार्थ जाधव, प्रतापगड टायगर्स या संघाचे नेतृत्व शरद केळकर आणि पन्हाळा जॅगवार्सचे नेतृत्व महेश मांजरेकर करणार आहेत.
मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांच्या माध्यमातून रोज प्रेक्षकांना भेटणाऱ्या १०० हून अधिक कलाकार आणि तंत्रज्ञावर ६ कॅप्टन्सने बोली लावली. एखाद्या खेळाडूसाठी दोन कॅप्टन्समध्ये रंगलेली चढाओढ जेवढी चुरशीची होती तेवढीच रंजकही होती. या सोहळ्यात मराठी कलाकारांवर लाखो रुपयांच्या (पॉइंट्स स्वरूपात) बोली लागल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पुनीत बालन सेलिब्रिटी लीग साठी कलाकारांचा लिलाव पार पडला.
हेही वाचा - जेलमधून सुटताना रिया चक्रवर्तीने केला होता डान्स, वाटली होती मिठाई