मुंबई - Prasad and Swapnil in Jilbi movie : महाराष्ट्रीयन चौरस आहारात गोड पदार्थांचाही समावेश असतो. सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे त्यामुळे निरनिराळ्या मिठाया खायला मिळत आहेत. या सर्व मिठायांत सर्वांच्या पसंतीस उतरणारी मिठाई म्हणजे जिलेबी. हीच जिलेबी प्रेक्षकांना भरवायला येत आहेत महाराष्ट्राचे दोन सुपरस्टार्स स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक. किंबहुना ते स्वतःही त्या जिलेबीचा आस्वाद घेताना दिसतील त्यांच्या या 'जिलबी' आगामी मराठी चित्रपटात.
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे कलाकार त्यांच्या गोड वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वागण्याचा गोडवा त्यांच्या अभिनयातूनही झिरपताना दिसेल 'जिलबी’ या चित्रपटातून. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून सेटवर त्यांची 'जिलबी' धमाल सुरु असते. आपल्या मिश्किल स्वभावाने त्यांची मनोरंजनाचा गोडवा देखील वाढवत ठेवला आहे. चित्रीकरणाच्या एका सत्रादरम्यान त्या दोघांनी सर्वांसोबत जिलेबीचा आस्वाद घेण्याचा मस्त प्लॅन आखला. त्यांनी एक व्हिडीओ देखील बनविला ज्यात त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे यांची फिरकी घेत आपले विनोदी अंगही दर्शविले.
गेली अनेक वर्षे मनोरंजनसृष्टीत कार्यरत असलेले स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी याआधी कधीही एकत्र काम केलेलं नाहीये. ते ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. दिग्दर्शक नितीन कांबळे म्हणाले की, 'स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक ही दोन गोड माणसं एकत्र आली आहेत आणि चित्रपटाच्या नावात गोडवा आहे म्हणजे या 'जिलबी' चा गोडवा दुपटीने किंबहुना तिपटीने वाढणार याची खात्री आहे.' या ‘जिलबी’ त शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत.
मच्छिंद्र बुगडे यांनी 'जिलबी' ची कथा-पटकथा लिहिली असून संवादही त्यांचेच आहेत. गणेश उतेकर यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली असून कलादिग्दर्शन कौशलसिंग यांनी केले आहे. सहनिर्माते रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे आहेत आणि महेश चाबुकस्वार कार्यकारी निर्माते आहेत. 'जिलबी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे आनंद पंडित मोशन पिक्चरने, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -