मुंबई : ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट 'ओपेनहाइमर' हा भारतीय बॉक्स ऑफिसवर सध्या चांगली कमाई करत आहे. 'ओपेनहाइमर' चित्रपट २५ जुलै रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने ५ दिवसात बॉक्स ऑफिसवर एकूण ६२ कोटी रुपयांची कमाई केली असून आपल्या मजबूत दावेदारीचे संकेत दिले आहे. नॉन फ्रँचायझी हॉलीवूड चित्रपटाने ५ व्या दिवशी ६.२५ कोटीची कमाई केली आहे. या हॉलीवूड चित्रपटाने एक नवीन विक्रम रूपेरी पडद्यावर प्रस्थापित केला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्क रिपोर्टनुसार 'ओपेनहाइमर' चित्रपटाने 'बार्बी' चित्रपटाला कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. 'ओपनहाइमर' चित्रपटाने सुरुवातीच्या वीकेंडमध्ये भारतात १९२३ स्क्रीन्सवर प्रदर्शित होऊन ६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
रॉबर्ट जे. ओपेनहायमर यांच्या जीवनावर आधारित : ख्रिस्तोफर नोलनचा 'ओपेनहाइमर' चित्रपट जागतिक स्तरावर, यूएस आणि यूकेनंतर भारतात खूप कमाई करत आहे. 'ओपेनहाइमर' चित्रपटात सिलियन मर्फीने रॉबर्ट जे. ओपेनहायमरची भूमिका साकारली आहे. रॉबर्ट जे. ओपेनहायमर यांनी अणुबॉम्ब विकसित केला होता. हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटात त्यांच्या कामबद्दल सांगण्यात आले आहे. तसेच या चित्रपटात दुसऱ्या महायुद्धात नेमके काय घडले होते या सर्व गोष्टी योग्य रित्या मांडण्यात आल्या आहेत. 'ओपेनहाइमर' चित्रपटामध्ये ओपेनहाइमरच्या पत्नीची भूमिका एमिली ब्लंटने केली आहे. या चित्रपटात अणुऊर्जा आयोगाचे माजी प्रमुख लुईस स्ट्रॉसच्या भूमिकेत रॉबर्ट डाउनी जूनियर देखील आहेत.
१०० कोटी पार करेल : काई बर्ड आणि मार्टिन जे शेर्विन यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या २००५ च्या अमेरिकन प्रोमिथियस: द ट्रायम्फ अँड ट्रॅजेडी ऑफ जे. रॉबर्ट ओपेनहाइमर या चरित्रातून हा चित्रपट बनविण्यात आला आहे. ओपेनहायमर चित्रपटात रामी मालेक, गॅरी ओल्डमन, डेन डेहान, जोश हार्टनेट, केनेथ ब्रानाघ, मॅथ्यू मोडीन, केसी ऍफ्लेक, एल्डन एरेनरीच आणि जेसन क्लार्क यांच्या देखील प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट या वीकेंडमध्ये १०० कोटीचा आकडा पार करणार अशी अपेक्षा केली जात आहे.
हेही वाचा :