‘प्यार का पंचनामा’ हा चित्रपट तरुणाईला खूप आवडला होता आणि त्यातील कार्तिक आर्यन आणि नुशरत भरुचा हे दोन नवीन कलाकार प्रेक्षकांच्या नजरेत भरले होते. त्यानंतर आलेल्या ‘सोनू के टिटू की स्वीटी’ त्या दोघांना स्टारडम मिळाले. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ मधून नावारूपास आलेली अभिनेत्री नुशरत भरुचा सध्या चांगल्या चित्रपटांचा भाग होतेय. गेल्यावर्षी ओटीटी वर प्रदर्शित झालेल्या ‘छोरी’ मधील तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. हा सिनेमा पूजा सावंत अभिनित मराठी चित्रपट ‘लपाछपी’ चा रिमेक होता. आता नुशरत भरुचाचा नवीन चित्रपट ‘जनहित में जारी’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. त्यात ती कंडोम विक्री करणाऱ्या युवतीची भूमिका साकारतेय. या चित्रपटाच्या प्रोमोशनवेळी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी अभिनेत्री नुशरत भरुचा बरोबर संवाद साधला.
प्रश्न - ‘सोनू के टिटू की स्वीटी’ हा तुझ्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला.......उत्तर - हो. फक्त माझ्यासाठीच नाही तर कार्तिक (आर्यन) आणि सनी सिंग साठी सुद्धा तो एक मैलाचा दगड होता. आमचे आयुष्य आमूलाग्र बदलले, चित्रपटाच्या व्यापारानुसार, बॉक्स ऑफिसनुसार, चित्रपटसृष्टीनुसार. अभिनयानुसार म्हणायचे झाले तर ते आम्ही ‘प्यार का पंचनामा’ च्या दोन्ही भागांतून सिद्ध केले होते. ‘प्यार का पंचनामा’ मधील अभिनयामुळेच माझ्याकडे ‘सोनू के टिटू की स्वीटी’ सारखा चित्रपट आला.
प्रश्न - ‘जनहित में जारी’ मध्ये तू कंडोम-विक्रेती च्या भूमिकेत आहेस. किती कठीण वा सोपे होते ते? ...उत्तर - कठीण होते असे मी मुळीच म्हणणार नाही. मला अशा चॅलेंजिंग भूमिका करायला मजा येते. भूमिका कठीण असेल तर ती साकारायला मेहनत घ्यावी लागते आणि ते आव्हान स्वीकारायला मला नेहमीच आवडते. आपल्या समाजात अजूनही ‘कंडोम’ हा शब्द ऐकल्यावर समोरच्याच्या कपाळावर प्रश्नार्थक भाव उभे राहतात. त्यात मुलीने कंडोम मागितले तर विचारायलाच नको. आणि मी तर एका लहानश्या शहरातील कंडोम विक्रेतीची भूमिका करतेय त्यामुळे समाजातील प्रतिक्रिया काय काय असतील याचा विचार करा. परंतु मी या चित्रपटाचे लेखक राज शांडिल्य याचे मला कौतुक वाटते की त्याने या विषयाला हात घातला आणि या संदेशात्मक चित्रपटातून विनोदी ढंगाने पेश केलाय. खरंतर मला जेव्हा ‘ड्रीम गर्ल’ ऑफर झाला होता तेव्हा वाटले होते की चला कोणीतरी मला सकारात्मक भूमिका देतोय. परंतु ‘ड्रीम गर्ल’ आयुष्मान (खुराना) आहे हे कळल्यावर आश्चर्य वाटले होते परंतु चित्रपट उत्तम चालला याचे समाधान आहे. हा चित्रपट करताना मी राजला म्हणायचे की बाबारे मलाही दोन-चार कॉमेडी लाईन्स दे, माझेही कॉमेडी टाईमिंग चांगले आहे. त्यावर तो हसायचा आणि म्हणायचा, चार लाईनी कशाला, मी तुला अख्खा विनोदी चित्रपटच देणार आहे. ‘ड्रीम गर्ल’ संपता संपता त्याने मला ‘जनहित में जारी’ची कथा ऐकविली आणि ती ऐकल्यावर मी लगेच होकारही दिला.
प्रश्न - तू विविध शैलीच्या भूमिका करतेयस, त्याबद्दल काही सांगशील का?....उत्तर - मला नेहमीच वेगळा कन्टेन्ट असलेल्या भूमिका करायला आवडतात. या इंडस्ट्रीत मी आलेच मुळी आशयघन चित्रपट करण्यासाठी, अर्थात कमर्शियल सिनेमाचे मला वावडे नक्कीच नाहीये. तसं बघायला गेलं तर माझा पहिला चित्रपट ‘प्यार का पंचनामा’ देखील वेगळ्या वाटेवरचा सिनेमा होता. मी नेहमीच संहिता वाचताना ती प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून वाचते आणि ती भावली तरच तो चित्रपट करते. छलांग, अजीब दास्तान, छोरी याच्या संहिता माझ्यातील अभिनेत्रीला आव्हान देणाऱ्या होत्या त्यामुळे त्या साकारताना मजा आली. ‘जनहित में जारी’ मध्येदेखील आपल्या देशातील समस्येचा विषय आहे. वाढत्या लोकसंख्येला आवरण्यासाठी कंडोम चे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. आणि ही समस्या विनोदी ढंगाने मांडल्यामुळे प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन होईल ही खात्री मी देऊ शकते. त्यामुळे कंडोम विक्रेती ची भूमिकासुद्धा मी खूप एन्जॉय केली.
प्रश्न - तू दशकभर मनोरंजनविश्वात वावरतेयेस परंतु तुझे कोणाबरोबर नाव जोडलेले कधी दिसले नाही..... उत्तर - माझे नाव कोणाबरोबर जोडलेले दिसत नाही कारण माझ्या आयुष्यात तशी कोणी व्यक्तीच नाहीये. अर्थात मीडियापासून काही लपून राहत नाही. मला तर वाटते की पापाराझींला माझ्यात इंटरेस्टच नसावा कारण ते मला, इतर कलाकारांना फॉलो करतात तसे, कधी फॉलो करताना दिसत नाहीत. माझे मित्रवर्तुळ नॉन-फिल्मी आहे त्यामुळे मीडियाला मला फॉलो करण्यात रस नसावा.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
प्रश्न - तुझ्या आईला वाटतेय की लवकरात लवकर ‘सेटल’ व्हावेस......उत्तर - लॉकडाऊन च्या काळात तश्या बातम्या पसरल्या होत्या. मला लग्न कारण्यासाठी म्हणून लग्न करायचे नाहीये. मी आहे तशी स्वीकारणारा नवरा हवा असे मी आईला सांगितले. मला आयुष्य छानपणे जगायला आवडते आणि जर का मूल हवे असेल तर दत्तक घेण्याचा मार्ग आहे की. खरंतर ‘सोनू के टिटू की स्वीटी’ च्या आधी मी लग्न करण्याच्या विचारात होते. परंतु डेटिंग, लग्न, मुलं, त्यांचे सुरुवातीचे संगोपन यात जवळपास सहा सात वर्ष गेली असती. मग मी ती वर्ष माझ्या करियर साठी देण्याचे ठरविले आणि आता मी या स्थानी आहे. माझा पार्टनर मला हवा तसा हवाय आणि तो फिल्म इंडस्ट्रीमधील अजिबात नसावा.
प्रश्न - ‘जनहित में जारी’ मधील विषयामुळे ट्रोलिंग होईल ही भीती नाही वाटली?....उत्तर - आपला देश जनसंख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आताच काही उपाययोजना नाही केली तर आपले काही खरे नाही. ‘जनहित में जारी’ आम्ही या समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. कंडोम मागणे अथवा विकणे यार गैर काय आहे? अर्थातच सामाजिक बदल आणण्यासाठी, वेळ घेण्याची वेळ आली आहे. अर्थात जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर बाहेर आला त्यानंतर माझ्यावर टीकेची झोड उठली. मुलगी असून कंडोम कशी काय विकू शकते? आणि अनेक उलटसुलट कमेंट्स आले. त्याचा मला मानसिक त्रास नक्की झाला कारण दोन दिवस मी झोपू शकले नाही. तिसऱ्या दिवशी मी निग्रह केला की ट्रोलिंग ला सामोरे जाणे गरजेचे आहे. आणि मग मी, सर्वांच्या संमतीने, ट्रोलिंगला उत्तर देणारा तिखट शब्दातील व्हिडीओ बनविला आणि त्याचा चांगला परिणाम झाला.
प्रश्न - सध्या मानसिक आरोग्याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. तुझं काय मत आहे?... उत्तर - आमच्या व्यवसायात अपेक्षा आणि आशा महत्वाच्या आहेत. चित्रपट फ्लॉप झाला की वेदना होतातच. मी ते अनुभवलंय. माझा ‘आकाशवाणी’ हा चित्रपट सपाटून आपटला. त्यानंतर मला वाटले की आता सर्व संपले. मला नैराश्य आले होते. दोन वर्ष मी ‘डिप्रेशन’ मध्ये होते. यातून बाहेर कसे पडायचे होते हे कळतंच नव्हते. त्यानंतर मी मनोविकार तज्ज्ञाकडे गेले. व्यावसायिक वैज्ञानिक मदत मिळाल्यामुळे मी सावरू शकले.
हेही वाचा - 'जवान'ची अभिनेत्री नयनताराच्या लग्नाला हजर राहणार शाहरुख खान