मुंबई - ‘थ्रिलर’ शैली प्रेक्षकांना आवडते हे ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिन्ही पर्वांना मिळालेल्या यशामधून दिसून येतं आणि त्यामुळेच झी मराठीवरील या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेची ३ यशस्वी पर्व गाजली. ‘रात्रीस खेळ चाले' च्या तिसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्स प्रेक्षकांना आवडताहेत आणि आता त्यांना अजून एक नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे.
आता काय होईल मालिकेत
माई ने आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळविण्याचा खटाटोप केला. एक अशिक्षित स्त्री सुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते हे तिनं सिद्ध केलं. आता लवकरच नाईकांचा वाडा शापमुक्त होणार आहे. नुकतंच मालिकेत दिसलं की अण्णा वच्छीला सांगतात की अण्णांनी मारलेली माणसं पण अतृप्त भूतं झाली आणि ती आता नाईकांचा बळी मागत आहेत. त्यावेळी वच्छी अण्णाला दोन पर्याय देते - मुक्ती किंवा शेवंता. पण शेवंता वाड्याबाहेरील अतृप्त भूतांना वाडा पेटवून द्यायला सांगते. तेव्हा वच्छी अण्णाला एक बळी द्यायचं कबूल करते. अण्णांच्या मागणीसाठी नाईकांच्या वाड्यावर घरातील बळी कोण जाणार याबद्दल भीती निर्माण होते. माई देवघरात जाऊन कुटुंबासाठी बळी जायला ती तयार असल्याचं सांगते. पण माई बळी जाण्यासाठी जाते तेव्हा तिच्यावर काळी सावली येते. ही काळी सावली कोणाची, ही सावली माईंचं रक्षण करणार की घात, अतृप्त भुतांसाठी माईंचा बळी जाणार का, या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात मिळतील.
हेही वाचा - बॉलिवूड सौंदर्यवतींचा ग्रॅझिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये जलवा