मुंबई: हिंदी, मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) आज वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राईस घेऊन येणार होती. आपल्या नवीन चित्रपटाची ती घोषणा करणार होती. मात्र आपल्या दमदार अभिनयाने मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे या घोषणेची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. रोहित मित्तल दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंग बायस, नेहा पेंडसे बायस आणि निखिल महाजन यांनी केली असून चित्रपटाचे लेखन श्रीपाद देशपांडे आणि रोहित मित्तल यांचे आहे. सध्या जरी या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात असले तरी लवकरच ते प्रेक्षकांसमोर येणार आहे. (Neha Pendse will give a surprise soon)
चित्रपटाच्या घोषणेची ही योग्य वेळ नाही: सगळ्यांचे आभार मानत नेहा पेंडसे म्हणते, 'माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबीयांनी, मित्रमंडळींनी, चाहत्यांनी माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, त्यासाठी मी सर्वांची खूप आभारी आहे. खूप छान वाटते जेव्हा आपल्यावर कोणी इतके प्रेम करते. या खास दिनी मी माझ्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार होते, मात्र सध्या चित्रपटाच्या घोषणेची ही योग्य वेळ नाही असे मला वाटते. आपल्या सर्वांचे लाडके, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Veteran actor Vikram Gokhale) यांचे नुकतेच निधन झाले. सिनेसृष्टीने एक उत्कृष्ट कलाकार गमावला आहे. त्यामुळे या घोषणेसाठी आम्ही थोडी प्रतीक्षा करणार आहोत.'
नव्या प्रोजेक्टची घोषणा लांबणीवर: निर्माते निखिल महाजन म्हणतात, 'नेहाच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार होतो. यापूर्वी मी नेहासोबत 'जून' मध्ये काम केल्याने तिच्या कामाची पद्धत मला माहित आहे. ती एक हरहुन्नरी अभिनेत्री तर आहेच याशिवाय ती उत्तम निर्माती आहे. त्यामुळे तिच्यासोबत आणखी एक नवा प्रोजेक्ट मी करत आहे. मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे आमच्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा आम्ही लांबणीवर नेली आहे. विक्रम सर आणि माझे अनोखे नाते आहे. 'गोदावरी' आणि आज ज्या चित्रपटाची घोषणा होणार होती, त्या चित्रपटातही विक्रम सरांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आज ते आपल्यात नाही, परंतु त्यांच्या आठवणी आमच्यासोबत कायम असतील. हा नवीन चित्रपट आम्ही त्यांना समर्पित करणार आहोत.'