मुंबई - जेव्हा एखादा अभिनेता ॲक्टिंग शिकून चित्रपटसृष्टीत दाखल होतो तेव्हा त्याच्याकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. अर्थात त्यातील बरेचसे ‘हिरो’ बनले नाहीत तरी ते इतर रोल्स मध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करतात. नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून प्रशिक्षण घेऊन चित्रपटांत भूमिका करण्यासाठी सज्ज झाला. परंतु, चांगला ॲक्टर आणि प्रसिद्धी या अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. नवाझुद्दीनला फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप स्ट्रगल करावा लागला आहे. त्याने पोटापाण्यासाठी अगदी एक-दोन सीन असलेले रोलसुद्धा केलेत. परंतु विद्या बालन अभिनित ‘कहानी’ मध्ये त्याने रंगविलेला पोलीस ऑफिसर प्रेक्षकांना भावला आणि त्याला मोठे रोल्स मिळू लागले. गँग्स ऑफ वासेपूर चे दोन्ही भाग, द लंचबॉक्स, रामन राघव सारख्या चित्रपटांतून त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली.
सादत हसन मंटो च्या आयुष्यावरील ‘मंटो’ या चित्रपटात त्याने शीर्षक भूमिका केली ज्यासाठी त्याने एक रुपयासुद्धा मानधन घेतले नव्हते आणि हा चित्रपट फ्रांसच्या नामांकित कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतरीत्या निवडला गेला होता. नवाझुद्दीन सिद्दीकी हा जगातील एकमेव अभिनेता आहे ज्याचे तब्बल ८ सिनेमे कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतरीत्या निवडले गेले आणि स्क्रीन झाले आहेत. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारीया अभिनित आणि नवाझुद्दीनची महत्वपूर्ण भूमिका असलेला, ‘हिरोपंती २’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याच्या प्रोमोशनच्या दरम्यान नवाझुद्दीन सिद्दीकीने 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत गप्पा मारल्या त्यातील हे काही क्षण.
तू ‘हिरोपंती २’ मध्ये करीत असलेल्या खलनायकी भूमिकेचे नाव ‘पिंकी’ आहे. त्याबद्दल काय सांगशील?
नेहमी माझ्या भूमिकांत वेगळेपण असावे याबद्दल मी आग्रही असतो. बऱ्याच वर्षांपासून एखाद्या पुरुष खलनायकामधे स्त्रीत्व असलेली शेड टाकावी असे मनात होते, अगदी मी थिएटर करीत होतो तेव्हापासून. थोडासा बायकी पद्धतीने बोलणारा इसम अचानक रौद्र रूप धारण केल्यावर त्या भूमिकेतील विरोधाभास प्रेक्षकांच्या नक्कीच अंगावर येईल असे मला वाटत आले आहे. ‘हिरोपंती २’ चा खलनायक क्रूर आहे परंतु तो मारामारी करीत नाही. तो गोड बोलता बोलता अचानक रानटी होतो त्यामुळे त्याची कायम भीती वाटत राहते. तो कायम ‘अनप्रेडीक्टेबल’ रीतीने वागतो त्यामुळे त्या भूमिकेला वेगळीच धार चढली आहे. मी लेखक, दिग्दर्शक यांच्याबरोबर चर्चा केली आणि ‘पिंकी’ चा जन्म झाला. मला नेहमीच हटके भूमिका साकारायला आवडतात. मध्यंतरी माझ्यात रोमँटिक भूमिका करण्याचे खूळ शिरले होते. मी ४-५ रोमँटिक चित्रपट केलेही. परंतु आता मी पूर्वपदावर आलो आहे आणि आता तर माझ्या डोक्यात अजूनही भन्नाट आयडीयाज झिम्मा खेळताहेत.”
भूमिका निवडीचे तुझे निकष काय आहेत? तुझ्या मनात काही व्यक्तिरेखा आहेत का ज्या तुला पडद्यावर साकारायला आवडतील?
भूमिका निवडण्याचे निकष म्हणजे ती सकस असणे गरजेचे आहे. तिचा कॅरॅक्टर ग्राफ उत्तम असणे, तिचे कथेतील स्थान महत्वाचे असणे अश्या सर्व गोष्टींचा विचार मी करतो. मी हल्लीच न्यूयॉर्क ला गेलो होतो एमी अवॉर्ड्स च्या संदर्भात. ‘सिरीयस मेन’ मधील भूमिकेसाठी माझे नॉमिनेशन झाले होते आणि माझ्यासोबत बेस्ट ॲक्टर नॉमिनेशन मध्ये अजून तीन अभिनेते होते. त्यातील डेविड टेनंट ला तो पुरस्कार मिळाला, ‘डेस’ या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा एमी पुरस्कार मिळालेला त्याचा चित्रपट मी पाहिला आणि अचंबित झालो. या अभिनेत्याने फक्त एका जागी बसून काम केले आहे. एका खुनाच्या गुन्ह्यात त्याला पकडले जाते आणि तो म्हणतो की मी १ नाही तर १६ खून केले आहेत. मग त्याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातात आणि त्याचे चौकशी होते आणि सिनेमा घडतो. त्याने फक्त डोळे आणि नजर वापरत अफलातून अभिनय केलाय. मलासुद्धा अश्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न म्हणून मी एक संहिता लिहिण्यास सुरुवात देखील केली आहे. अर्थात मी काही लेखक नाही त्यामुळे माझ्या कल्पनेवर एका चांगल्या लेखकाकडून ती मी लिहून घेतोय. हा एक फेस्टिवल सिनेमा असेल. यात एका ॲक्टर च्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य असेल. अर्थात माझ्या काही कलाकार मित्रांच्या अनुभवांवर आधारित हे स्क्रिप्ट असेल आणि अर्थातच मी प्रमुख भूमिका करणार आहे.”
हल्ली सोशल मीडिया स्टार्स निर्माण झाले आहेत, त्यावर तुझे काय मत आहे?
सोशल मीडिया फोफावला आहे आणि अनेकांना आपल्यातील सुप्त गुणांना वाट मोकळी करून देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मदत करतो. पण ते सर्व क्षणिक आहे. एक दीड मिनिटांचे रील बनविणे सोप्पे आहे आणि ते बनवून तुम्ही स्वतःला अभिनेता समजू लागतात. परंतु ते मृगजळ आहे. सिनेमा करताना कडक मेहनत घ्यावी लागते, त्यात बरेच परिश्रम असतात. आणि महत्वाचे म्हणजे दोन अडीच तास प्रेक्षकांनां बांधून ठेवायचे असते जे बरेच कठीण काम आहे. तसेच एखादे रील तासाभरात बनत असेल परंतु सिनेमा बनविताना एक दोन महिने लागतात आणि त्यातील कलाकारांना भूमिका ‘धरून’ ठेवाव्या लागतात. त्यात ‘सचमुच घोडे खुल जाते हैं’.
लॉकडाऊन मध्ये तू गावी गेला होतास. काय काय केलं?
लॉकडाऊन मध्ये सगळंच बंद होतं. मी डेहराडून ला गेलो होतो. तिथे एका पर्वतावर छोटंसं एकच रिसॉर्ट आहे ते मी बुक केलं होतं. आम्ही फक्त तीन माणसं होतो. हॉटेल मालक, मी आणि माझी आई. माझी मुलगी दुबईत शिकतेय म्हणून ती येऊ शकली नाही. निसर्गाच्या सान्निध्यात कोरोनापासून दूर राहता आलं. त्या काळात मी खूप सिनेमे बघितले. इतरवेळी काही चांगलं बघण्यासाठी वेळच मिळत नाही. इथेही मला मुश्किलीने फक्त दोन तास मिळतात आणि मग मी प्लॅन करून आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहतो.
नवाझुद्दीन चा लकवर नाही तर १००% मेहनतीवर विश्वास आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी कराटेचं प्रशिक्षण घेणार आहे. ‘सिक्स पॅक्स करणार का?’ यावर तो म्हणाला, “का नाही? तशी भूमिका समोरून आली तर नक्की सिक्स पॅक्स करेन. परंतु आता ते करून कुठे फिरू?” तो कंगना रानौत निर्मित ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात भूमिका करतोय ज्यात त्याची हिरॉईन आहे अवनीत कौर. कंगना स्वतः एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिने नवाझुद्दीन च्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. नवाझुद्दीन ने ही कंगना एक उत्तम निर्माती आहे असा निर्वाळा दिलाय.
‘हिरोपंती २’ मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी ‘पिंकी’ च्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांचे मन जिंकेल असं वाटतंय.