मुंबई : लेखक दिग्दर्शक मानव सोहल यांनी राज कपूर यांचा चित्रपट, त्यांची साधी-साधी पात्रे रंगवत, त्यांच्या गाण्यांची आणि संगीताची जादू मोठ्या पडद्यावर सादर करीत, या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची आठवण करून देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील काही दृश्ये, काही संवाद, काही गाणी इतकी छान झाली आहेत की, प्रेक्षकांना प्रभावित करत आहेत. लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून मानव सोहल यांनी हा चित्रपट प्रभावीपणे मांडला असून; राज कपूर यांची आठवण करून देण्यात ते यशस्वी ठरले आहे. अभिनेत्री श्रावणी गोस्वामीनेही आपला मंत्रमुग्ध करणारा अभिनय यात सादर केला आहे.
चित्रपटात काय आहे : मैं राज कपूर हो गया' या चित्रपटात राज (मानव सोहल) आणि सुमन (अरशीन मेहता) लग्न करतात, दोघे खूप आनंदात राहतात पण एका अपघातामुळे दोघे वेगळे होतात. वेगळेपणा आणि एकाकीपणामुळे त्रस्त झालेला राज मद्यपी बनतो. तो त्याचा भूतकाळ पुन्हा आठवेल का, हेच या कथेत दाखवले आहे. या चित्रपटातून मानव सोहलने यांनी राज कपूर यांचे तत्वज्ञान, त्यांचा साधेपणा, त्यांचा निरागसपणा ठेऊन चित्रपट तयार केला आहे. खरे तर या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी राज कपूर यांची शैली, त्यांचा सिनेमा, त्यांची पात्रे यांची युवापिढीला ओळख करून दिली आहे. भावना, नाटक, प्रेम, सत्य, त्याग, आठवणींचे वळण निघून जाणे आणि पुन्हा येणे या सर्व गोष्टी असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो आहे.
समाजातील वास्तवता दाखवणारा चित्रपट : राज कपूर ज्याप्रमाणे समाजातील वाईट गोष्टी आपल्या चित्रपटांतून मांडायचे, त्याचप्रमाणे पोलिसांपासून सामाजिक संस्थांपर्यंत धावणारे लोकही भ्रष्ट असल्याचे मानव सोहल यांनी या चित्रपटातून दाखवून दिले आहे. बार गर्लकडे समाज ज्या दृष्टिकोनातून पाहतो तोही मांडण्यात आला आहे. चित्रपटातील काही संवाद तुम्हाला हादरवून सोडतात. श्रीमंत लोकांकडे महिलांवर खर्च करण्यासाठी भरपूर पैसा असतो, परंतु ते गरीब आणि गरजूंसाठी कधीही मदत करत नाहीत. हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
स्टुडिओ आणि बंगल्याची विक्री : राजकपूर यांना भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोमैन म्हणून ओळख आहे. राजकपूर यांचा आर के स्टुडिओ नुकताच विकला गेला होता. त्यानंतर त्यांचा बंगला गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने विकत घेतला आहे. या बंगल्याच्या जागी प्रीमियम रियल एस्टेट प्रोजेक्ट बनवला जाणार आहे. राजकपूर यांचा हा बंगला गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने कितीला विकत घेतला याची माहिती समोर आली नसली तरी सुमारे १०० कोटी रुपयांना हा बंगला विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. राजकपूर यांचा बंगला देवनार फार्म रोड येथे टाटा इन्स्टिट्युट ऑफ सायन्स येथे आहे. हा विभाग चेंबूर मधील सर्वात श्रीमंत विभाग म्हणून ओळखला जातो.