मुंबई - ‘टकाटक’ च्या पहिल्या भागाप्रमाणे दुस-या भागातील कथानकही अर्थातच तरूणाईवर आधारित आहे. असं असलं तरीही तरूणाईपासून थोरांपर्यंत सर्वचजण ‘टकाटक २’च्या कथानकाशी एकरूप होतील. मराठी बॅाक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या 'टकाटक' या मराठी चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'टकाटक २'ची रसिक खूप आतुरतेनं वाट पहात आहेत. नुकतेच 'टकाटक २'चं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आलेल्या 'टकाटक २'च्या मोशन पोस्टरमध्ये सर्वच कलाकारांची धमाल पहायला मिळत आहे. 'टकाटक'च्या यशानंतर 'टकाटक २' जणू इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या 'टकाटक २'च्या मोशन पोस्टरनं अल्पावधीतच लक्षवेधी लाईक्स मिळवले आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची पसंती मिळवत बाजी मारल्याचंही चित्र पहायला मिळत आहे. 'टकाटक २'च्या माध्यमातून रसिकांना पुन्हा एकदा एक फ्रेश कथानक अनुभवायला मिळणार आहे.मिलिंद कवडे यांनी नेहमीच आपल्या कलाकृतींद्वारे मनोरंजक कथानकाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. ऍडल्ट कॅामेडी असूनही प्रेक्षकांनी जसा 'टकाटक'मधील सामाजिक संदेश समजून घेऊन चित्रपट डोक्यावर घेतला तसाच 'टकाटक २' देखील घेतील असा विश्वास कवडे यांनी व्यक्त केला आहे.
'टकाटक २'मध्ये प्रथमेश परब सह अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आणि इतर कलाकारांच्याही भूमिका आहेत. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांची संकल्पना असलेल्या 'टकाटक २'ची कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी यांनी प्रसंगानुरुप संवादलेखन केलं आहे. सिनेमॅटोग्राफी हजरत शेख वली यांनी केली असून अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. गीतकार जय अत्रेनं या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरूण लिखतेनं संगीत दिलं आहे. निलेश गुंडाळे यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
'टकाटक २' निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.