मुंबई - Morya movie Premier: लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'च्या आयकॉनिक चित्रपटगृहामध्ये पहिल्यांदा 'प्रीमियर शो' करण्याचा मान 'मोऱ्या' या मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला युरोपमधील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'मोऱ्या' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाची वाट अनेकजण पाहत आहेत. 'एलएचआयएफएफ बार्सिलोना', 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव', 'खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२', 'पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'अयोध्या फिल्म फेस्टिव्हल', 'लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' इत्यादी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांत 'मोऱ्या' चित्रपटानं सर्वोत्तम चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे.
'मोऱ्या'ची कहाणी आहे अनोखी : दरम्यान नव्या वर्षात येत्या 12 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जितेंद्र बर्डे यांनी केलंय. या चित्रपटामध्ये एका सफाई कर्मचाऱ्याची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कहाणी रेखाटण्यात आली आहे. 'मोऱ्या'चं शूटिंग धुळे जिल्ह्यातील 'पिंपळनेर या ठिकाणी करण्यात आलंय. जितेंन्द्र बर्डे यांना या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची साथ लाभली आहे.
'मोऱ्या' चित्रपटाची स्टार कास्ट : 'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स' निर्मित 'मोऱ्या'मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, सुरज अहिवळे, शिवाजी गायकवाड, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर, दीपक जाधव, विजय चौधरी, अविनाश पोळ, रुपाली गायके आणि जितेंद्र पुंडलिक बर्डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मोऱ्या' चित्रपटाबद्दल सांगताना लेखक दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी माहिती दिली की, ''कान्ससह विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आमची पहिली निर्मिती असलेल्या 'मोऱ्या' या चित्रपटावर जाणकार, रसिक आणि समीक्षकांचे लक्ष होतं. युके मधील प्रीमियर शो पाहून बरेच प्रेक्षक स्तब्ध झाले. 'मोऱ्या' हे पात्र मनात अस्वस्थता, चलबिचल, काहूर निर्माण करते, अशी प्रतिक्रिया तेथील अनेक प्रेक्षकांनी बोलून दाखवली. हाच अनुभव युरोपसह, महाराष्ट्रातील काही खाजगी शोज्'च्या दरम्यान येत आहेत.''
हेही वाचा :