मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून एक काळ गाजविलेल्या अभिनेत्री प्रेमा किरण यांचे ( Prema kiran passed away ) रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. त्यांनी ‘अर्धांगी', 'धूमधडाका', 'दे दणादण' यासारख्या चित्रपटात काम केले होते.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमा किरण हे खूप मोठे नाव होते. त्यांची आणि स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी तुफान हिट झाली होती. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील प्रेमा किरण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी चांगलीच गाजली होती आणि त्यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘अर्धांगी', 'धूमधडाका', 'दे दणादण', 'गडबड घोटाळा', 'सौभाग्यवती सरपंच', 'माहेरचा आहेर' अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. तसेच ‘पागलपन’, ‘अर्जुन देवा’, ‘कुंकू झाले वैरी’ आणि ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’ या चित्रटांमध्येही त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. पितांबर काळे दिग्दर्शित ‘गाव थोर पुढारी चोर’ या चित्रपटातून दिसल्या. ‘फ्रेंडशिप बँड’ आणि ‘एए बीबी केके’ या चित्रपटांचाही भाग होत्या. त्यांनी जवळपास ४७ चित्रपटातून भूमिका केल्या.
प्रादेशिक भाषेतही केले काम
प्रेमा यांनी केवळ मराठी चित्रपटातच नव्हे तर तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. बहूभाषिक अभिनयासोबतच त्यांनी चित्रपटनिर्मितीत पाऊल टाकले होते. ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर त्यांनी ‘थरकाप’ या चित्रपटाच्या निर्मितीचीही धुरा वाहिली होती. मोठा पडदा गाजविल्यानंतर प्रेम किरण यांनी छोट्या पडद्यावर आगमन केले.
दे दणादण मधील सांगितला होता किस्सा
झी मराठीवरील ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमात त्यांनी ‘दे दणादण’ या चित्रपटाविषयीचा एक किस्सा ऐकविला होता आणि सर्वांचे मन जिंकले होते. त्या चित्रपटातील ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांना सायकलवरून पाडलं होतं, तेही तीन वेळा हे त्यांनी उत्तमरीत्या रंगवून सांगितले होते आणि हशा पिकविला होता. त्यानंतर, ‘मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला’, असे सांगत त्यांनी सर्वांना पुन्हा खूप हसविले होते.
हेही वाचा - Rishi Kapoor Death Anniversary : ऋषी कपूर यांची ४५ वर्षांची साथ तुटल्याने नीतू कपूर यांना वेदना