मुंबई - अभिनेत्री दिया मिर्झाची एक अनोखी ओळख आहे. तिचा अभिनय जसा एक पैलू आहे तसेच इतरही काही पैलू आहेत. वास्तविक एक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकलेली युवती ‘हम तुम्हारे दिल में रहते हैं‘ मधून चित्रपटसृष्टीत दाखल झाली ती म्हणजे दिया मिर्झा. त्यानंतर बऱ्याच चित्रपटांचा भाग बनल्यानंतर ती थोडाकाळ गायब झाली. आता नुकताच प्रदर्शित झालेल्या अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड‘ मध्ये ती एका महत्वाच्या भूमिकेत दिसली. लॉकडाऊनच्या काळातील चित्रपटाची गोष्ट असून संपूर्ण चित्रपट कृष्ण धवल आहे. आताच्या रंगीबेरंगी चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या कलाप्रेमींना हा सुखद धक्का होता. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असून नुकताच आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी अभिनेत्री दिया मिर्झा सोबत संवाद साधला.
‘भीड‘ ला चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट करतानाच ‘अनुभव‘ काय होता?
दिया - ‘भीड‘ करतानाच ‘अनुभव‘ नक्कीच सुखद होता. अर्थातच चित्रपटामध्ये सिरीयस गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा याने मला जेव्हा मला कथा ऐकविली तेव्हाच मला ती भिडली होती. त्यानंतर तो चित्रपट ब्लॅक अँड व्हाइटमध्ये करणार असल्याचे सांगितल्यावर मी थोडी हबकलेच होते. परंतु त्याने त्यामागची भूमिका सांगितली. लॉकडाऊनमध्ये अनेकांची आयुष्ये उध्वस्त झाली, होरपळली गेली. त्यांच्या जीवनातील रंग उडून गेला होता. या चित्रपटाचे कथानक त्या लोकांच्या व्यथा मांडते तेव्हा त्याही रंगांविना असाव्या असे त्याचे मत होते आणि मला ते पटलेही. माझ्या व्यक्तिरेखेलाही, जरी ते सुखवस्तू कुटुंबातील असले तरी, कारुण्याची झालर आहे. आपल्या लेकीला भेटण्यासाठी जाताना हायवेवर अडकलेल्या मातेची धडपड यातून दिसते. सामाजिक-राजनैतिक विषयांवर फारसे चित्रपट बनताना दिसत नाही. त्यामुळे मला अभिमान वाटतो अनुभवचा की त्याने या घटनांवर चित्रपट बनविला.
लॉकडाऊनने अनेकांना अनेक चित्रविचित्र अनुभव दिले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मी माझ्या बाळाला जन्म दिला. परंतु मला कोणत्याही नातेवाईकाला भेटता आले नाही. खरं म्हणजे या काळातील अनेक घटना आहेत ज्या जगासमोर आलेल्या नाहीत. मी नेहमीच अनुभवच्या कामाची फॅन राहिले आहे. आम्ही एकमेकांना गेली २३ वर्ष ओळखतोय. मी याआधी त्याच्यासोबत ‘थप्पड’ मध्ये काम केले होते आणि तेव्हाच त्याला सांगितले होते की मला तुझ्या पुढील सर्व चित्रपटांचा भाग व्हायला आवडेल. भीडमध्ये काम करताना देखील त्याने मला मोजक्याच शब्दांत माझे कॅरॅक्टर समजावले. खरंतर तो कलाकाराला मोकळीक देतो. परंतु त्याच्या मर्यादा त्याने आखून दिलेल्या असतात. त्याला सीनमधून नेमके काय हवंय हे नेमके माहित असते. त्याचे लिखाण बारकाव्यांसकट लिहिलेले असते. त्यामुळे कोणत्याही कलाकाराला काम करणे सोपे जाते. तो कधीच कलाकारांना ‘ओव्हर इंस्ट्रक्ट’ करीत नाही. त्याची पटकथा एवढी बंदिस्त असते, जणू काही एकाद्या नाटकाचा प्रयोग सुरु आहे. अनुभव सोबत व्यक्तिरेखेबद्दल चर्चा करताना भूमिकेचे वेगवेगळे पदर आपसूक दिसू लागतात. त्यामुळे एक कलाकार म्हणून तुमचा कस लागतो.
तुला कोणत्या चित्रपटांचा हिस्सा व्हावंसं वाटते?
मी वयाच्या १६ वर्षांपासून काम करतेय. १० वर्षांत बरंच काम केलं. परंतु जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा मी थोडी हादरले होते. मी काय करतेय हे मला समजत नव्हतं. त्यामुळे मी ब्रेक घेण्याचं ठरविलं. मधल्या काळात मी समाजसेवेशी जुळले. लग्न झालं, मुलं झाली. या काळात बराच अनुभव गोळा झाला. पुन्हा काम करू लागले तेव्हा हा अनुभव विविध व्यक्तिरेखा साकारताना उपयोगी पडला. मला आता चांगल्या लोकांसोबत काम करायचे आहे, चांगल्या प्रोजेक्ट्सचा हिस्सा व्हायचंय. मी स्वतः निर्माती सुद्धा आहे. त्यामुळे मला अशा चित्रपटांवर काम करायचं आहे जे समाजाला उपयुक्त ठरतील. मला पॉवरफुल कथांवर काम करायचं आहे. मानवी तस्करी, ड्रग्स, पॉलिटिक्स, वातावरण आणि पर्यावरण अशा विषयांवर चित्रपटनिर्मिती करायची आहे.
तुझी वेब सिरीज ‘काफिर’ ला चांगला प्रतिसाद मिळाला. तुझं वेब विश्वात काय चाललंय?
काफिरचा अनुभव खूप चांगला होता. ‘पीओके’ मधील एक महिला चुकून भारताच्या लाईन ऑफ कंट्रोलच्या पुढे येते. तिला अटक होते आणि ती अतिरेकी असल्याचा तिच्यावर ठपका ठेवला जातो. ती सात वर्षे जेलमध्ये काढते व एका मुलीला जन्मही देते. हे कथानक शहनाझ परवीन हिच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित असून या वेब सिरीजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ओटीटी हे एक सशक्त माध्यम आहे ज्याचा आवाका खूप मोठा आहे. माझ्याकडे बऱ्याच स्क्रिप्ट्स येत असतात. मी केलेल्या दोन वेबसिरीज तयार आहेत. यातील एक आहे ‘धक धक’. नाही, याचा माधुरी दीक्षितशी काहीही संबंध नाही. धक धक ही चार महिलांची कथा आहे आणि त्यासाठी आम्ही हिमालयात गेलो होतो. रत्ना पाठक शहा, संजना संघी, फातिमा सना शेख आणि मी अशा सर्वजणी बाईक चालविताना दिसणार आहोत. मला तर माझेच अप्रूप वाटते की वयाच्या ४० व्या वर्षी मी बुलेट चालवायला शिकले आणि चक्क हिमालयात ती चालविली. माझ्या विशीत जर कोणी मला सांगितले असते की तू चाळीशीत बाईक चालवायला शिकशील तर मी कदापिही विश्वास ठेवला नसता.
तू बोलताना तुझ्यातील इंटेलिजन्स डोकावतो. दिग्दर्शन करण्याचा विचार आहे की नाही?
प्रथम, केलेल्या स्तुतीबद्दल धन्यवाद. मला विशाल भारद्वाज, श्रीराम राघवन, अनुराग कश्यप सारख्या अनेक दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे. माझे दिग्दर्शक मित्र मला नेहमी हेच सांगतात की तू दिग्दर्शनाकडे वळ. परंतु सध्यातरी मला इतरांच्या दिग्दर्शनाखाली वावरायला आवडतंय.