सध्या कान चित्रपट महोत्सवाबद्दल बरीच चर्चा आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे ७५ वे वर्ष. यावर्षी भारताला विशेष सन्मान देण्यात आला असून भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी सध्या कान चित्रपट महोत्सवात हजेरी लावताना दिसताहेत. संदीप सिंग दिग्दर्शित 'सफेद' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण ७५ व्या कान चित्रपट महोत्सवादरम्यान करण्यात आले. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकार आणि अकादमी पुरस्कार विजेते ए. आर. रहमान यांच्या हस्ते हॉटेल ले मॅजेस्टिक, कान येथे या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले.
'सफेद' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करते वेळी ए. आर. रहमान असे म्हणाला की, "मी या चित्रपटाचा टीझर पाहिला आणि तो अतिशय मनोरंजक, रंगीत आणि महत्वाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणारा आहे. मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देत आहे, आणि असेच कायम चमकत रहा असे सांगेन." 'सफेद' चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सिंग म्हणाले, “ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे की जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी, कान येथील ७५ व्या चित्रपट महोत्सवादरम्यान, माझ्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाचा पहिला लूक लाँच करून आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. माझे हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे.”
दरम्यान, मुख्य अभिनेत्री मीरा चोप्रा म्हणाली, "सफेद' हा माझ्यासाठी खास चित्रपट आहे. हे सर्व संदीप सिंग यांच्यामुळेच आहे, ज्यांनी या कथेची दिग्दर्शनात पदार्पण करताना निवड केली. हा महत्वाचा संदेश देणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर कान सारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात लाँच होत आहे आणि ते ही प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या हस्ते ही अतुलनीय बाब आहे.” मुख्य अभिनेता अभय वर्मानेही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की "प्रत्येक अभिनेत्याची महत्त्वाकांक्षा ही कान मध्ये डेब्यू चित्रपट करण्याची असते आणि मी इथे आज उभा आहे याने मी धन्य झालोय. माझे दिग्दर्शक संदीप सिंग यांचा माझ्यावरचा विश्वासामुळे हा प्रवास खरोखरच संस्मरणीय ठरला. मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की माझ्या चित्रपटाचा पहिला लूक आपल्या देशाची शान, ए. आर. रहमान यांच्या हस्ते झाला आहे."
या चित्रपटाचे निर्माते विनोद भानुशाली म्हणाले, "या वर्षी भारत कान च्या ७५ व्या वर्षी 'कंट्री ऑफ हॉनर' आहे आणि सफेद चित्रपटाला या महोत्सवात विशेष स्थान मिळणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आणि विलक्षण गोष्ट आहे. ए. आर. रहमान यांच्या हस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण झाले ही आम्हाला गौरवांकित करणारी बाब आहे.”
या पोस्टर लाँचसाठी प्रमुख कलाकार अभय वर्मा आणि मीरा चोप्रा यांच्यासह लेखक-दिग्दर्शक संदीप सिंग, निर्माता विनोद भानुशाली आणि सहनिर्माते विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता उपस्थित होते. हा चित्रपट भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज यांनी प्रस्तुत केला असून विनोद भानुशाली, अजय हरिनाथ सिंग, संदीप सिंग यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलली, आणि कमलेश भानुशाली, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि जफर मेहदी यांनी सहनिर्माते म्हणून चित्रपटाची बाजू सांभाळली आहे.
हेही वाचा - 'धर्मवीर'चा सिक्वेल येणार, निर्माता मंगेश देसाईंची मोठी घोषणा