मुंबई - सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री योगिता बाली यांचा मोठा मुलगा महाक्षय/महाअक्षय हा मिमोह चक्रवर्ती या नावाने चित्रपटसृष्टीत वावरतो. २००८ साली मिमोहने जिमी नावाच्या चित्रपटातून पदार्पण केले. मिथुन चक्रवर्ती चे ‘जिमी जिमी आ जा ...’ हे डिस्को डान्सर मधील बप्पी लाहिरी यांनी बनविलेले गाणे प्रचंड गाजले होते. काही महिन्यांपूर्वी ते गाणे चीनमध्येसुद्धा प्रसिद्ध झाले होते परंतु वेगळ्या कारणासाठी. चिनी लोक आपल्या सरकार विरोधात हे गाणे वापरताना दिसले. चायनीज म्हणजेच मँडरिन भाषेत ‘जी मी जी मी’ चा अर्थ होतो ‘(आम्हाला) भात द्या’ आणि रिकामी भांडी वाजवीत ते अन्नधान्याचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आणून देत होते. असो, तर मिथुनचे जिमी जिमी हे गाणे खूप गाजले होते आणि म्हणून आपल्या मुलाच्या पदर्पणीय चित्रपटाला ते नाव देण्यात आले होते, कदाचित. तर मिमोह चक्रवर्ती ची प्रमुख भूमिका असलेल्या जिमी साठी त्याला फिल्मफेयरचे बेस्ट न्यूकमर चे नॉमिनेशन मिळाले होते.
मिमोहने अनेक चित्रपटांतून काम केले आहे जसे की, इश्कदरियां, रॉकी, लूट, ही - द ओन्ली वन, हॅमिल्टन पॅलेस, मैं मुलायम सिंग यादव इत्यादी त्याने भारतातील सर्वप्रथम, विक्रम भट दिग्दर्शित, स्टिरीओस्कोपिक हॉरर सिनेमा 'हौंटेड थ्री डी' मध्ये काम केले होते आणि तो त्याचा पहिला हिट चित्रपट होता. आता मिमोह ची महत्त्वपूर्ण भूमिका असलेले दोन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत, रोष आणि जोगिरा सा रा रा. रोषच्या प्रमोशन वेळी मीमोह चक्रवती याने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी गप्पा मारल्या.
तुझे दोन सिनेमे येताहेत. त्याबद्दल काय सांगशील? - येत्या १२ मे ला माझे रोष आणि जोगिरा सा रा रा हे चित्रपट प्रदर्शित होताहेत. बऱ्याच वेळा दोन कलाकारांचे एकच दिवशी वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यात दोघांत स्पर्धा होते. यावेळेस माझेच दोन चित्रपट रिलीज होताहेत म्हणजेच माझीच माझ्याबरोबर स्पर्धा आहे. (हसतो) परंतु काही कारणास्तव रोष चे प्रदर्शन पुढे ढकलले गेले होते आणि जोगिरा सा रा रा ची तारीख आधीच ठरली होती. परंतु या दोन्ही चित्रपटांत स्पर्धा नसेल कारण जोगिरा चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय तर रोष जिओ च्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर. तसेच प्रेक्षक जियो वर रोष फुकटात बघू शकणार आहेत त्यामुळे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. माझी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या जोगिरा सा रा रामध्ये नवाझुद्दिन सिद्दीकी आणि नेहा शर्मा सारखे कसलेले कलाकार आहेत तसेच या चित्रपटाची कथा अनोखी आहे त्यामुळे तो प्रेक्षकांना खूप भावेल.
रोष बद्दल बोलायचं झालं तर त्यातील प्रत्येक पात्र जसे दिसते तसे नाहीये. माझ्या पात्राला अनेक लेयर्स आहेत. कांदा सोलताना जसे एकामागोमाग एक पदर उलगडत जातो तशी माझी भूमिका आहे. याचा सस्पेन्स थ्रिलर जॉनर आहे आणि यातील थरार प्रेक्षकांना शेवटापर्यंत खिळवून ठेवेल. दोन्ही चित्रपटातील माझ्या भूमिका अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या आहेत. रोष मध्ये मी कॉम्प्युटर प्रोफेशनल आहे तर जोगीरा मध्ये मी लखनौ मधील सिधा साधा तरुण आहे. मला वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात. मला स्वतःला चॅलेंज करायला आवडते. मी एकच तऱ्हेच्या भूमिका करीत राहिलो तर अभिनेता म्हणून मी ग्रो होऊ शकणार नाही. जर मी सेफ खेळत राहिलो तर मलाच मजा येणार नाही.
आता रोषचे उदाहरण घ्या. लेखक दिग्दर्शक जयवीर याने मला कथा ऐकाविली. मला ती खूप आवडली. परंतु मी त्याला सांगितले की, बाबारे, माझी ऑडिशन घे. मला स्क्रिप्ट ऐकवीली यात तू माझा सन्मान केलयेस. परंतु म्हणून मी त्याचा गैरफायदा घेणे चुकीचे ठरेल. मी या रोल साठी योग्य दिसतो की नाही हे ऑडिशन केल्यावर कळेल. मी रीतसर ऑडिशन दिली आणि ती सर्वांनी पास केल्यावर मी यातील भूमिका केली.
तुझ्या भावाचा, नमोशी चा, पदार्पणीय चित्रपट बॅड बॉय नुकताच प्रदर्शित झाला. तीसुद्धा चित्रपटांमध्ये बिझी असतोस. घरातून कसा पाठिंबा असतो? - आम्ही चार भावंडं, दोन भाऊ आणि दोन बहिणी. आम्ही एकमेकांचे मित्र अधिक आहोत, भाऊ बहीण नंतर. एकमेकांच्या खोड्या काढत असतो, फिरकी घेत असतो परंतु सर्वांमध्ये प्रेम खूप आहे. आपापल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी आम्ही एकमेकांशी शेयर करीत असतो. आम्ही जे करतो किंवा करायचे ठरवितो त्याला आई बाबांचा पाठिंबा असतो. माझे वडील नेहमी मदतीला तत्पर असतात.
माझे वडील मिथुन चक्रवर्ती एक सेल्फ मेड व्यक्ती आहेत. त्यांनी खूप स्ट्रगल करून नाव पैसा कमावला आहे. त्यांच्या मते आम्हीही जे काही करू ते स्वतःच्या हिमतीवर करावं. त्यांना फिल्म इंडस्ट्री मान आहे आणि त्यांनी शब्द टाकला तर ते त्यांच्या मुलांना काम देऊ शकतात. परंतु माझ्या वडिलांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी कुणाकडेही शब्द टाकणार नाही, ते माझ्या तत्वांविरुद्ध असेल. मी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत पाय टाकायचे ठरविले तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की, "मेरी तरफ देखना भी मत!' त्यांनी मला कधीही प्रेशराइजड केलं नाही की तू ॲक्टर हो. ॲक्टर होणे हे माझं मीच ठरविलं होतं. त्यांच्या मते, ते एखादा कॉल देखील करतील परंतु ते त्यांच्या रुल मध्ये बसत नाही. तसेच जर का त्यांनी कॉल करून मला काम मिळालं आणि ते यशस्वी झालं तर त्याचा आस्वाद मला मनापासून घेता येणार नाही. कारण ते यश देखील त्यांचं यश असेल. त्यात मजा नसेल. ते नेहमी सांगतात की स्वतः मेहनत करून मिळविलेल्या यशाची गोडी काही औरच असते.
तुझा एक चित्रपट ओटीटी वर रिलीज होतोय तर दुसरा चित्रपटगृहांत. त्याबद्दल तुझे काय मत आहे? - आता जमाना बदलत चालला आहे. प्रेक्षकांना चांगले मनोरंजन हवेय मग ते कुठल्याही प्लॅटफॉर्म मिळो. आधी चित्रपटगृहे तुडुंब भरली जायची. परंतु आता परिस्थिती त्याच्या उलटी आहे. कोरोनाच्या आघातानंतर परिस्थितीत आमूलाग्र बदल झालाय. लॉकडाऊनच्या कालखंडात प्रेक्षकांनी, खासकरून तरुणाईने, जागतिक स्तरावरील कलाकृती पहिल्या. त्यामुळे आपले सिनेमे अनेकांना पांचट वाटू लागले आहेत आणि सिनेमा कसा चालवायचा या यक्षप्रश्न फिल्म इंडस्ट्रीला पडलाय. वेळेनुसार बदलणे गरजेचे आहे. आपल्याला काय आवडते किंवा प्रेक्षकांना हेच आवडेल अश्या पद्धतीने बनलेले सिनेमे धडाधड पडताहेत. प्रेक्षकांना काय हवे याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. कलाकारांनी बदलत्या मागणीनुसार पुरवठा करायला हवा. यू शुड पीक युवर बॅटल. कारण आजचा प्रेक्षक स्टार्सना बघायला सिनेमागृहांत जात नाही. तो उगाचच १०००-२००० रुपये खर्च करण्यासाठी थिएटर ची पायरी चढणार नाही. त्याला त्याच्या पैशाचा मोबदला मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीला आणि कलाकारांना काळानुरूप बदलणे गरजेचे आहे.