मुंबई - Mahadev App and Lion Book App Case : महादेव बुक ॲपनंतर लायन बुक ॲपच्या माध्यमातून देश परदेशात मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी सुरू असल्याचं तपासात समोर आलं आहे. महादेव ॲपप्रमाणेच भारतासह पाकिस्तानमध्ये या सट्टेबाजीच्या ॲपच्या माध्यमातून सट्टेबाजी चालत असल्याचा तपास संस्थांना संशय आहे. महादेव ॲप कंपनीचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी हितेश खुशलानी नावाच्या व्यक्तीला या ऍपचा नवा प्रमोटर बनवला आहे. मात्र, अप्रत्यक्षरित्या हे दोघेच ॲप चालवत असल्याची माहिती ईडीला प्राप्त झाली आहे.
महादेव बुक ॲप आणि लायन बुक ॲप : या लायन बुक ॲपचे प्रमोशनदेखील बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारांनी केले असून या प्रमोशनकरिता त्यांनी कोटींच्या घरात मानधन स्वीकारले आहे. आता ही स्वीकारलेली रक्कम उघड झाली आहे. या सर्व कारणामुळे बॉलिवूडचे कलाकार आता ईडीच्या रडारवर आले आहेत. लायन बुक ॲपची सक्सेस पार्टी गेल्या वर्षी 20 सप्टेंबरला दुबईतील एका हॉटेलमध्ये झाली होती. या पार्टीसाठी अनेक बॉलीवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. संजय दत्त, सुनील शेट्टी, सोफी चौधरी, स्नेह उलाल, डेजी शहा आणि जॉर्जिया एड्रीयानी असे अनेक लायन बुक ॲपच्या सक्सेस पार्टीला कलाकार उपस्थित असल्याची चर्चा आहे.
रणबीर कपूर होणार चौकशी : बॉलीवूडमधील अभिनेते आणि गायकांनी महादेव बुक ॲपचे प्रमोटर चंद्रकार यांच्या लग्न सोहळ्याला दुबईमध्ये हजेरी लावली असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात हा लग्न सोहळा पार पडला असून अभिनेता टायगर, श्रॉफ सनी लियोनी, गायक विशाल ददलानी आणि नेहा कक्कर या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. त्याचप्रमाणे महादेव ॲपचे प्रमोशन केल्या संदर्भात अलीकडेच अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समस बजावून रायपूर ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्यानं दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता.
ईडीचा तपास सुरू : महादेव ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन कॅसिनो आणि सट्टेबाजी सह अनेक बेकायदेशीर गोष्टी चालवल्या जातात. महादेव बुक ॲपच्या सक्सेस पार्टीनंतर दोन दिवसांनीच लायन बुक ॲपच्या सक्सेस पार्टीसाठी बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यासाठी त्यांना मानधन म्हणून मोठी रक्कम देण्यात आली होती. ही रक्कम हवालामार्फत देण्यात आली असल्याचे ईडीच्या तपासात दिसून येत आहे. त्यामुळे आता महादेव बुक ॲपनंतर लायन बुक ॲप हे ईडीच्या रडारवर आले आहे.
हेही वाचा :