मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. शिवाजी गायकवाड असे मराठमोळे नाव असलेला हा सुपरस्टार मराठी असल्याबद्दलचा अभिमान सतत बाळगत आलाय. काही वर्षांपूर्वी रजनीकांतने दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी त्याने मराठीत संवाद साधला होता. त्याचे मराठी दाक्षिणात्य पध्दतीचे आहे. घरातही तो मराठीतच बोलतो असे त्याने सांगितले होते.
रजनीकांतचे मूळ घराणे महाराष्ट्रीय आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात कोयाळी हे त्यांचे मूळ गाव असल्याचे सांगण्यात येते. मात्र, पुरंदर तालुक्यात मावडी-कडेपठार हेही त्यांचे गाव असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे त्यांच्या गायकवाड घराण्याचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असल्याचे त्यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते.
रजनीकांतचा जन्म मराठा कुटुंबातील असून त्याच्या कुटुंबीयांची नावे
रजनीकांतचे नाव - शिवाजीराव गायकवाड
वडीलांचे नाव - रामोजीराव गायकवाड
आईचे नाव - जिजाबाई गायकवाड
रजनीकांतचे भाऊ - सत्यनारायण राव गायकवाड आणि नागेश्वर राव गायकवाड
रजनीकांतची बहिण - अश्विनी बाळुबाई गायकवाड
रजनीकांतची पत्नी - लता रंगाचारी
रजनीकांतची मुलगी - ऐश्वर्या शिवाजीराव गायकवाड व आणि सखुबाई शिवाजीराव गायकवाड ऊर्फ सौंदर्या रजनीकांत
मराठी चित्रपटात काम करण्याची रजनीकांतची इच्छा - राजनीकांत याचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्यापपर्यंत काम केलेले नाही. मात्र, आगामी काळात तशी पटकथा असेल तर मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले होते.
सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार - २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिळ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनीज बुकमध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपानमध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपानमध्ये रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
बस कंडक्टर ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास - शाळेत असताना दारिद्र्यामुळे त्यांना खूप कठीण परिस्थितीतही दिवस काढावे लागले. बंगळूर येथील आचार्य पाठशाळा या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले. १९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूरमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे केली. त्यानंतर ते बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून नियुक्त झाले. नंतर चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नईला अभिनय शिकण्याकरता गेले. मद्रास फिल्म इंस्टीट्यूटमध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकिर्द १९७४-७५ मध्ये सुरू केली.