मुंबई : मराठी बाणा आणि त्याला लाभलेली साहसाची जोड उपस्थितांना प्रोत्साहन देणारी होती. एकंदरच दादर हा परिसर उत्साहाने भरलेला होता. या रॅलीला सोहळ्याचे स्वरूप आले होते. या दरम्यान बाईकस्वार महिलांना पैठणीने गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त खेळांचे आणि लकी ड्रॅाचे आयोजनही करण्यात आले होते. विजेत्या महिलांचा महाराष्ट्राच्या महावस्त्राने सन्मान करण्यात आला. या वेळी सायली संजीव, दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्यासह चित्रपटाची टीम उपस्थित होती. ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोहळ्याचे आयोजन : प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे औचित्य साधून आम्ही बाईक रॅलीचे, खेळांचे आयोजन केले. या सगळ्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला असून सर्व महिलांनी एन्जॅाय केले. यावेळी उपस्थित महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. महिलांनी आपली आवड जपावी, आपली स्वप्नं जगावी, याचं हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रेक्षकांचे प्रेम आम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारे : हा सोहळा बघून भारावलेली सायली संजीव म्हणते, या माझ्या मैत्रिणींनी माझ्याप्रती जे प्रेम व्यक्त केले आहे, त्याने मला खरंच खूप छान वाटले. हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. वेळात वेळ काढून आज माझ्या मैत्रीणी इथे आल्या, त्यांचे मनापासून आभार. यावेळी अनेक उपस्थितांनी चित्रपट पाहाणार असल्याची इच्छाही व्यक्त केली. प्रेक्षकांचे हे प्रेम आम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारे आहे.
प्रमुख भूमिका : 'गोष्ट एका पैठणीची'ची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत. सायली संजीव (Sayali Sanjeev), सुव्रत जोशी (Suvrat Joshi), मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni), सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.