वाराणसी : भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या हायप्रोफाईल प्रकरणाचा प्रत्येक अॅंगलने तपास करत आहेत. दरम्यान, आकांक्षा हिच्या मृत्यूपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्याआधारे पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी आकांक्षा दुबेची आई मधू दुबे आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहे.
एका व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले : या प्रकरणी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंहसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी आकांक्षा दुबेच्या आईने वाराणसी पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरून एका व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्यक्तीने त्या रात्री वाराणसीच्या लहरतारा भागात पार्टी आयोजित केली होती. यामध्ये पत्नीच्या सांगण्यावरूनच आकांक्षा पार्टीत पोहोचली. त्याचे फुटेज समोर आले आहे. 25 मार्चच्या रात्रीच्या या व्हिडिओमध्ये आकांक्षा दुबे, हा माणूस आणि त्याची पत्नी आणि इतर काही लोकांसोबत क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आकांक्षा डान्स करताना दिसत आहे.
समर सिंहलाही अटक करण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न : हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आकांक्षा दुबे हत्याकांडात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. 25 मार्चच्या रात्री पार्टीत आकांक्षासोबत दिसणाऱ्यांपैकी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, रविवारी सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, व्हिडिओमध्ये आकांक्षाला हॉटेलमध्ये सोडणाऱ्या संदीप सिंहची पोलिसांनी आधीच चौकशी केली आहे. पोलीस संदीपची पुन्हा चौकशी करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, समर सिंहलाही अटक करण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूनंतर भोजपुरी गायक समर सिंहने एक पोस्ट शेअर केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होते.