मुंबई : कोल्हापूरातील ज्या सैनिक टाकळी गावात ‘भारत माझा देश आहे’ हा चित्रपट चित्रित झाला, त्याच गावात त्याचे टीझर प्रदर्शित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशसेवेत आपले अमूल्य योगदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांशी यावेळी पत्रकारांनी, कलाकारांनी संवाद साधला. काही सैनिकी कुटुंबीयांचा यावेळी सत्कारही करण्यात आला.
यात देशाच्या सीमेवर सुरू झालेली लढाई ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून सर्वांच्या घराघरात पाहायला मिळत आहे. ही बातमी पाहून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या घरच्यांची होणारी तळमळ या टीझरमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटात राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बाल कलाकारांसह मंगेश देसाई, शशांक शेंडे, हेमांगी कवी,छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाची तगडी टीम
या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांनीच लिहिली असून या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले असून अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. तर निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद आहेत. निलेश गावंड यांनी 'भारत माझा देश आहे'चे संकलन केले असून छायांकन नागराज यांनी केले आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पिकल एंटरटेनमेंटने सांभाळली आहे. ‘भारत माझा देश आहे' हा देशभक्तीपर चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - Ranbir-Alia wedding: ऋषी कपूर यांचे स्वप्न खरे झाले, नीतू कपूर यांची भावूक पोस्ट