मुंबई - कुठलाही पुरस्कार कलाकाराला अजून जोमाने काम करण्याची स्फूर्ती देतो. आणि करियरच्या सुरुवातीलाच जर अवॉर्ड्स मिळू लागले तर उत्तम अभिनेता/अभिनेत्री हा शिक्का आयुष्यभर काम देतो. हाच अनुभव आलाय तरुण अभिनेत्री उर्मिला जगतापला. मराठी मालिकांमध्ये विविध कामं केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला जगतापने रौद्र सिनेमातून पदार्पण केले. एप्रिलमध्ये रौद्र हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातल्या उर्मिलाच्या कामाचं कौतुक झालं होतं.
उर्मिलाला आता पुरस्कार रुपानेही कौतुकाची थाप मिळाली आहे. उर्मिलाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आयोजीत ७ व्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये उर्मिलाला हा पुरस्कार मिळाला आहे. रौद्रमध्ये उर्मिलाने मृण्मयी नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. ७० च्या दशकातील सिनेमा असल्याने त्या काळची भाषा, वागणं हे सर्व उर्मिलाने आत्मसात केलं. त्याचबरोबर उर्मिला संस्कृतही शिकली. आपल्या कामाचं झालेल्या कौतुकामुळे उर्मिला खुषीत आहे.
या पुरस्काराबाबत उर्मिला म्हणाली, ‘’पहिला पुरस्कार हा नेहमीच खास असतो. शाळेत असताना कराटेसाठी पारितोषिक मिळाले होते. त्यावेळी जग जिंकल्यासारखं वाटत होतं आणि आता या क्षेत्रात आल्यावर हा पहिला पुरस्कार त्याचा आनंदही तेवढाच आहे. पण, हा पुरस्कार जास्त स्पेशल आहे कारण हा पुरस्कार माझ्या महत्वाकांक्षेसाठी मिळवलेला पुरस्कार आहे. या पुरस्काराने माझ्या पंखात बळ आलं आहे आणखी चांगलं काम करण्यासाठी. रौद्र सिनेमाची टीम आणि मला आत्तापर्यंत माझ्या प्रवासात साथ दिली त्या सर्वांचे आभार.”
यानंतर उर्मिला जगताप ‘श्यामची आई’ या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेतून दिसणार आहे तसेच काही गाण्यांमध्येही ती दिसून येणार आहे.
हेही वाचा - 'बंदो में था दम' : भारताने ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची गाथा