मुंबई - 'बाईपण भारी देवा' चित्रपट रिलीज झाल्यानंतर २६ व्या दिवशीही चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचण्यात यशस्वी ठरत आहे. बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या आकड्यांनी तर ट्रेड पंडितांनाही चकित केले आहे. २४ व्या दिवशी ३.२५ कोटी तर २५ व्या दिवशी १ कोटीचा गल्ला जमा झाला. अशा तऱ्हेने चित्रपटाची एकूण कमाई ६६.६१ कोटीपर्यंत पोहोचली आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट ५ कोटीच्या खर्चात निर्माण केला आहे. पहिल्या शोपासून सिनेमा प्रेक्षकांच्या ह्रदयापर्यंत पोहोचला आणि लोकांनीच त्याला उचलून धरत चित्रपटाचे माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून प्रमोशन केले. केदार शिंदेंना बायांच्या मनातील कळते, असे गंमतीने म्हटले जाते. त्यांनी निर्माण केलेला 'अग्गबाई अरेच्चा' या चित्रपटाची तीच तर थीम होती. बाईच्या मनात काय विचार सुरू आहे हे ऐकणारा नायक त्यांनी पडद्यावर उभा केला. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. , 'मुकाम पोस्ट लंडन', 'जत्रा', 'अगं बाई अरेच्चा', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'गलगले निघाले', 'अगं बाई अरेच्चा २', 'महाराष्ट्र शाहीर' असे लोक प्रिय चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. शाहीर साबळे हे केदार शिंदेंचे आजोबा होते. त्यांच्या जीवनावरील चित्रपट अलिकडेच त्यांनी बनवला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कोरोनानंतर मराठी चित्रपट सृष्टीत शुकशुकाट पसरला होता. अखेर रितेश देशमुखच्या 'वेड'ने यावर मात केली आणि प्रेक्षकांना पुन्हा सिनेमागृहाकडे वळवले.
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'वेड' चित्रपटाने एकूण ७५ कोटीची कमाई केली होती. त्याच पावलावर पाऊल केदार शिंदेचा बाईपण भारी देवा टाकत आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुख स्टारर 'वेड' चित्रपटाने २४ दिवसात ५४.४० कोटीची कमाई केली होती. हा आकडा 'बाईपण भारी देवा'ने आधीच गाठला आहे. या चित्रपटाची वाटचाल आता ७५ कोटीच्या दिशेने सुरू झाली आहे. प्रेक्षक पुनःपुन्हा चित्रपट पाहायला येताना दिसताहेत तर अजूनही चित्रपट न पाहिलेले वेळ काढून आणि दूरवरुन येऊन चित्रपटाला हजेरी लावतात. देशभरातील हैदराबाद, बेंगलुरू अशा अमराठी मुलखातही चित्रपटाचे शो अजूनही हाऊसफुल्ल सुरू आहेत.
हेही वाचा :
- Shah Rukh Khan and salman khan : 'टायगर ३' मधील शाहरुखचा लूक, 'या दिवशी' होऊ शकतो प्रदर्शित !!
- PRABHAS KALKI 2898 AD : 'प्रोजेक्ट के' लांबणीवर, 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेत 'मोठा' फेरफार
- Dhindhora Baje Re Song out : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटामधील 'ढिंढोरा बाजे रे' गाणे रिलीज..