मुंबई - Akshay Kumar cricket team :हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता अक्षय कुमार सध्या चर्चेत आला आहे. त्यानं आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता त्यानं आणखी एक नवी सुरुवात केली आहे. खिलाडी कुमारनं क्रिकेट संघ विकत घेतला आहे. अक्षय कुमारसाठी 2023 वर्ष चित्रपटच्या दृष्टीनं चांगल नव्हतं. फेब्रुवारीमध्ये रिलीज झालेला 'सेल्फी', ऑगस्टमध्ये रिलीज झालेला 'ओएमजी 2' आणि ऑक्टोबरमध्ये रिलीज झालेला 'मिशन राणीगंज' या चित्रपटांनी फारशी चांगली कामगिरी केली नाही. दुसरीकडे, चित्रपट व्यवसायासोबतच अक्षय हा क्रीडा व्यवसायातही उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
अक्षय कुमार क्रिकेट संघाचा मालक : अक्षय कुमारनं इंस्टाग्रामवर जाहीर केले की, तो 'इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग'च्या श्रीनगर (जम्मू काश्मीर) संघाचा मालक बनला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''सिनेमापासून स्टेडियमपर्यंत! मला सांगायला अभिमान वाटतो की, मी श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथील संघाचा मालक म्हणून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये येत आहे. माझ्या संघात खेळण्याची अजून एक संधी शिल्लक आहे.'' याशिवाय त्यानं या संघात नोंदणी करण्यासाठी एक लिंकही दिली. 'आयएसपीएल' (ISPL) कोअर कमिटीचे सदस्य आशिष शेलार आणि अमोल काळे तसेच लीग कमिशनर सूरज सामंत यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
'आयएसपीएल'चं उद्दिष्ट : कोअर कमिटीचे सदस्य आशिष शेलार यांनी म्हटलं की, ''अक्षय कुमारची बोर्डावर उपस्थिती लीगसाठी चांगली ठरेल''. याशिवाय अमोल काळे यांनी म्हटलं, ''टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणण्याचे 'आयएसपीएल'चे उद्दिष्ट आहे. श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)च्या संघाचे मालक म्हणून अक्षय कुमार यांच्यासोबत आम्ही खेळाडू आणि चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करू. हे टेनिस बॉल क्रिकेटमधील लपलेले प्रतिभा शोधून काढण्यासाठी आणि नवोदित क्रिकेटपटूंना प्रसिद्धी मिळून देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम करण्याचा 'आयएसपीएल'चा उद्देश आहे''. दरम्यान अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्याकडे रोहित शेट्टीचा मल्टीस्टारर चित्रपट 'सिंघम 3' आहे. याशिवाय तो 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'स्काय फोर्स' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :