मुंबई - दिल्लीच्या द्वारकामध्ये एका तरुण विद्यार्थिनीवर बाईकवर आलेल्या दोन मुखवटाधारी व्यक्तींनी अॅसिडने हल्ला केला होता. यामध्ये ही विद्यार्थिनी गंभीर भाजली असून तिच्यावर सफदरजंग हॉस्पिटलच्या बर्न आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आरोपीने पीडितेवर नायट्रिक अॅसिड फेकले असावे असा अंदाज आहे.
दिल्लीत १७ वर्षांच्या मुलीवर अॅसिड हल्ला झाल्यानंतर, अभिनेत्री कंगना रणौतने तिची बहीण रंगोली चंदेलचा भीषण अनुभव आठवला. रंगोली २१ वर्षांची होती जेव्हा तिच्यावर अॅसिड हल्ला झाला होता आणि ती थर्ड डिग्री भाजली होती. कंगनाने एकदा नमूद केले होते की रंगोलीचा अर्धा चेहरा जळाला होता आणि तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली, एक वर्ष वाया गेले आणि स्तनाला गंभीर इजा झाली.
आत्ताच्या दिल्लीतील घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आपली बहिण रंगोली चंदेलवर झालेल्या अॅसिड हल्ल्याची आठवण सांगितली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून कंगना म्हणते, “मी किशोरवयीन असताना माझी बहीण रंगोली चंदेलवर रस्त्याच्या कडेला असलेल्या रोमियोने अॅसिड हल्ला केला होता. यात तिला 52 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. हा एक अकल्पनीय मानसिक आणि शारीरिक आघात होता. यामुळे एक कुटुंब म्हणून आम्ही उद्ध्वस्त झालो होतो. मला थेरपी देखील करावी लागली कारण मला भीती वाटत होती की माझ्याजवळून जाणारा कोणीही माझ्यावर ऍसिड फेकून देईल ज्यामुळे मी प्रत्येक वेळी दुचाकीस्वार, कार, अनोळखी व्यक्ती मला ओलांडून जाताना मी माझा चेहरा झाकते. अद्यापही हे अत्याचार थांबलेले नाहीत.... सरकारने या गुन्ह्यांविरुद्ध कठोरपणे कारवाई करण्याची गरज आहे.मी गौतम गंभीर यांच्याशी सहमत आहे, आम्हाला अॅसिड हल्लेखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज आहे...”
रांगोलीचे आता लग्न झाले असून तिला पृथ्वीराज हा पाच वर्षांचा मुलगा आहे. दुसरीकडे, कंगना तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात व्यस्त आहे, ज्यात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक आहेत.
हेही वाचा - सुपरस्टार रजनीकांत यांनी तिरुमला मंदिरात केली प्रार्थना