मुंबई : सिनेमाच्या पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत दुसऱ्यांना नेहमीच अडचणीत आणणारे अभिनेता शक्ती कपूर हे खासगी जीवनात स्वतः सध्या अडचणीत आले आहेत. म्हणूनच त्यांना मुंबई उच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. बॉलिवूड सिनेमात नेहमी खलनायकची भूमिका साकारणारे अभिनेता शक्ती कपूर हे आज मुंबई उच्च न्यायालयात आले होते.
शक्ती कपूर यांच्या संपत्तीविषयी माहिती : शक्ती कपूर यांच्या वकिलांनी सांगितले की, जुहू येथे शक्ती कपूर यांचे एक घर आहे. ते घर त्यांनी एका दाम्पत्याला भाड्याने दिलेले. मात्र, संबंधित दाम्पत्याचे आपसात भांडण झाले असून, दोघेही विभक्त झाले आहेत. तरीदेखील त्या रूमचा ताबा त्यांच्याकडेच आहे. अनेक वेळा सांगूनसुद्धा भाडोत्री दाम्पत्यांनी कपूर यांचे भाड्याने घेतलेले घर खाली केले नाही.
भाडोत्री दाम्पत्याने घेतली न्यायालयात धाव : या प्रकरणामध्ये खालच्या कोर्टाने अभिनेता शक्ती कपूर यांच्या बाजूने निर्णय दिला होता. तरीदेखील भाडोत्री दाम्पत्याने त्यांचे घर खाली केले नाही. त्याचबरोबर भाडोत्री दाम्पत्य यांनी खालच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्या प्रकरणात सुनावणी होती म्हणूनच आज शक्ती कपूर हे मुंबई उच्च न्यायालयात आले होते. मात्र, कोर्टाने शक्ती कपूर यांना पुढील तारीख दिली आहे.
हेही वाचा : शक्ती कपूरच्या सांगण्यावरुन जॅकी श्रॉफने खरेदी केले होते पहिले घर