मुंबई - ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन स्वराज्यासाठी’ हे ब्रीद घेऊन छत्रपती महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या मावळ्यांची यशोगाथा प्रत्येक जिल्ह्यात सापडते. यातील अनेक कहाण्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत आणि आता त्यातील काही गोष्टी चित्रपटांमार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. लढवय्ये सैनिक आणि त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलही माहिती त्यांना मिळते आणि इतिहासाच्या कोपऱ्यात खितपत पडलेल्या वीर लढवैयांना प्रकाशमान होण्याची संधी मिळत आहे. त्याच पठडीतील एक कथानक 'रावरंभा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटायला येतेय. यात राव यांच्या परक्रमाबद्दल तर कळेलच परंतु त्याची सहचारिणी रंभा बद्दलही कल्पना येईल.
राव आणि रंभा यांच्यातील प्रेम अध्याय - हिंदवी स्वराज्य उभे करताना छत्रपती शिवाजी महाराजांना लढायांसाठी शूरवीर मावळे तर मिळालेच परंतु त्यांचे शौर्य आणि पराक्रम यांसोबत अनेक षडयंत्रांचा सामना करावा लागला. यातील एक म्हणजे काहीसा दुर्लक्षित राहिलेला राव आणि रंभा यांच्यातील प्रेम अध्याय. तो आता उजागर होणार आहे 'रावरांभा' या ऐतिहासिक चित्रपटातून. लढाईच्या रणसंग्रामात फुललेले निरागस प्रेम या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. नाही म्हणायला सिनेमाविश्वात अनेक ऐतिहासिक प्रेमकथा बघायला मिळाल्या परंतु ही प्रेमकथा अनोखी आहे आणि ती प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालेल हे नक्की अशी ग्वाही दिग्दर्शक देताना दिसतो.
त्याग आणि प्रेमाची कथा रावरंभा - 'बऱ्याच ऐतिहासिक प्रेमकथा प्रसिद्ध आहेत. परंतु रावरंभा मधील प्रेमकथा त्याग, समर्पण शिकविणारी असेल. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणारा राव हा प्रेमासाठीदेखील जीवाचे रान करणारा आहे. रंभा देखील आपल्या पराक्रमी, शौर्यवान, बुद्धिमान राव साठी झुरत राहते. आम्ही ऐतिहासिक रणसंग्रामात ही प्रेमकथा बेमालूमपणे गुंफली आहे. 'आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे मानणारा रावजी आणि रंभाच्या प्रेमकथेत निष्ठा, शौर्य, त्याग आणि समर्पण यांची किनार दिसेल. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांत दडलेली ही दुर्लक्षित प्रेमकहाणी प्रेक्षकांना नक्कीच भावेल', असे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी सांगितले.
रावरंभा कास्ट आणि क्रू - शशिकांत पवार प्रॉडक्शनच्या बॅनर खाली 'रावरंभा' ची निर्माती शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी केली आहे. ओम भूतकर आणि मोनालिसा बागल यात प्रमुख भूमिकांत असून शंतनू मोघे, अशोक समर्थ, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, अश्विनी बागल, मयुरेश पेम, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाला मसाले,आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार, शशिकांत पवार हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसतील. गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांची गीते, अमितराज यांचे संगीत आणि आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे यांचे पार्श्वगायन या चित्रपटाला लाभले आहे. छायांकन संजय जाधव यांनी केलं असून प्रताप गंगावणे यांनी चित्रपटाची पटकथा, संवाद लिहिले आहेत. प्रभाकर परब यांच्या देवी सातेरी प्रॉडक्शन्स ची प्रस्तुती असलेला रावरंभा येत्या १२ मे ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.