वॉशिंग्टन ( यूएस ) - जगभरात गाजलेल्या 'फास्ट अँड फ्युरियस' चित्रपटाच्या दहाव्या भागाचे शुटिंग सुरू झाले आहे. हॉलिवूड अभिनेता विन डिझेल याने ही माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरुन कळवली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले, "पहिला दिवस."
'फास्ट एक्स' असे लिहिलेल्या चित्रपटाच्या लोगोचेही त्यांनी अनावरण केले. मात्र निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
जगविख्यात कलाकार टायरेस गिब्सन, लुडाक्रिस, मिशेल रॉड्रिग्ज, सुंग कांग, जेसन मोमोआ, डॅनिएला मेलचियर आणि ब्री लार्सन हे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. फास्ट अँड फ्यूरियसच्या दहाव्या भागाचे दिग्दर्शन जस्टिन लिन करत आहेत.
लिन हे अॅक्शन फ्रँचायझीच्या प्रमुख दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी यापूर्वी २०२१ च्या 'F9', तसेच 'फास्ट अँड फ्यूरियस 6', 'फास्ट फाइव्ह' आणि द फास्ट अँड द फ्युरियस: टोकियो ड्रिफ्ट'चे दिग्दर्शन केले आहे.
आगामी अॅक्शन-पॅक्ड चित्रपटाच्या कथानकाचे तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. विन डिझेलने केलेल्या चित्रपटाच्या शुटिंगच्या घोषणेने 'फास्ट अँड फ्युरियस'च्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.
हेही वाचा - विन डिजेलचा आगामी 'ब्लडशॉट'चा हिंदी ट्रेलर रिलीज