यवतमाळ - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस हे मतपेटी घेऊन मतदान केंद्रावर रवाना होत आहेत.
महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये आज निवडणूक विभागाकडून मतपेटीचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी स्ट्राँगरूम असून या स्ट्राँगरूममध्ये एकूण २ हजार १८१ मतपेट्या आहेत. मतदान केंद्रावर एकूण ११ हजार ७५ कर्मचारी मतदान केंद्रावर कर्त्यव्य बजावणार आहे. या निवडणुकीसाठी ३ हजार पोलीस कर्मचाऱ्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मतदारसंघात २ बॅलेट युनिट असणार असून त्यावर २४ उमेदवारचे नाव, तर एक नोटा हा पर्याय असणार आहे. जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रावर फक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. एकूण ६६० वाहनाने २१८१ मतदान केंद्रावर कर्मचारी आज पोहोचणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर रॅम्प, विद्युत व्यवस्था, शेड, पिण्याचे पाणी, मेडीकल किट, व्हीलचेअर आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. संघात ६ हजार ५६२ दिव्यांग मतदार आहेत. निवडणुकीकरीता जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यक्तिंसाठी एकूण ९७० व्हीलचेअर व एकूण ९२ रॅम्पची व्यवथा करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. २ हजार ४०० पोलीस कर्मचारी, ३०० पोलीस अधिकारी राहणार आहेत. ५५ अधिकारी परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी येणार असून रेल्वे पोलीस, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सही राहणार आहे.