अमरावती - इंदिरा गांधी यांच्यापासून गरिबी हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजीव आणि सोनिया गांधी यांनी देखील गरिबी हटावची भाषा केली. गेल्या ७२ वर्षात देशाची गरिबी तर हटली नाही. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची गरिबी हटली. असे म्हणून भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते अमरावती येथे बोलत होते.
गडकरी म्हणाले, की देशातील सर्व पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर पालिका, महापालिका, दिल्ली आणि मुंबई सगळीकडची सत्ता काँग्रेसकडे होती. काँग्रेसच्या काळात त्यांच्या नेत्यांनी आणि चेल्याचपाट्यांनी वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, वेगवेगळ्या संस्था मिळवल्या. यातून त्यांची गरिबी हटली. पण, देशातील सर्वसमान्य माणूस, दलित, मुस्लिम समाज मागास राहिला. त्यामुळे ही निवडणूक सर्वसामान्यांच्या भवितव्याचा निर्णय करण्याची आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार देशात आल्यावर खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत अशी भीती काँग्रेस दलित आणि मुस्लिमांना दाखवत आहेत. वास्तवात आमच्या सरकारने देशात सर्वाधिक जनहिताच्या योजना आणल्या. या योजनांचा लाभ देताना कधीही कोणाची जात किंवा धर्म पाहिला नाही. आज देशाच्य विकासासोबत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. देशाच्या हितासाठी मोदी हेच सक्षम पर्याय असल्याचे गडकरी म्हणाले.