औरंगाबाद - दहशतवाद्यांसमोर घुडघे टेकणारा 'मजबूर' पंतप्रधान पाहिजे, की दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणारा 'मजबूत' पंतप्रधान पाहिजे, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना विचारला. जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांची पैठण तालुक्यात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
आम्ही गंगा स्वच्छ केली नसती तर प्रियंका मॅडम तुम्हाला प्यायला पाणी मिळाले असत का? आज पाण्यावरची वाहतूक तयार केली म्हणूनच तुम्हाला वाराणसीला बोटीतून जाता आले, असे म्हणत नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, आम्ही अनेक योजना लागू केल्या. उज्वला गॅस योजना असो, की आयुष्यमान योजना असो, कधी जात बघून लाभ दिला नाही. तर मतदान देताना जात का पाहता असा प्रश्न नितीन गडकरी यांनी मतदारांना केला.
पश्चिम घाटातून वाहून जाणारे पाणी नद्यांमध्ये आणणार आहोत. ही ४० हजार कोटींची योजना असून, ते पाणी जायकवाडीला देण्याचे नियोजन होईल. डीपीआर तयार आहे, कॅनॉल ऐवजी पाईपलाईनने ते पाणी द्यायचा विचार आहे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, असे गडकरी म्हणाले. अर्धवट रखडलेले प्रकल्प केंद्राची मदत घेऊन पूर्ण करू, असे आश्वासन गडकरींनी दिले.
मराठवाड्यासह देशात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी ६० हजार कोटींची योजना असून ४० टक्क्यांपर्यंत सिंचन वाढणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी सभेत दिली. काँग्रेस नेहमी 'गरिबी हटाव'चा नारा देत आहे. माझ्या विभागात झालेल्या कामात एकही भ्रष्टाचार झाला नाही. रस्त्यावर २०० वर्षे खड्डा पडणार नाही, असे काम कल्याचे देखील गडकरी यांनी पैठणच्या सभेत सांगत भाजपला मत देण्याचे आवाहन मतदारांना केले.