सोलापूर - माढा मतदार संघात शिवसेना भाजपमध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे. शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संजय भोसले आणि माण तालुक्यातील काही विभाग प्रमुखांनी माण - खटाव तालुक्यातील भाजपच्या सभांना अनुपस्थिती दाखवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे समोर आले आहे.
माढा लोकसभा मतदार संघात शुक्रवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मेळावे आयोजित करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही मेळाव्यात व्यासपीठावरती शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवलेली दिसून आले. या सभांना चंद्रकांत पाटील, शेखर चरेगावकर, रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.
तसेच, शनिवारी झालेल्या सभांमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मध्यस्थी करावी लागली होती. यावरुन माढा मतदारसंघात भाजप-सेनेतील धुसफूस चव्हाट्यावर अली आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यात दिलजमाई घडवून आणण्यात युतीच्या नेत्यांना यश मिळते का? हे पाहणे महत्वाचे आहे.