नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील औरंगजेब रोडवरील एनपी सिनीअर सेकंडरी स्कुल येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस २०१९ ची ही लोकसभा निवडणूक बेरोजगारी, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटबंदी, राफेल, आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर लढवत आहे. ही लढाई खूपच रंगतदार झाली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींची या लढाईत द्वेष भावना जास्त प्रमाणात दिसून आली. जे की मी, ही लढाई प्रेमाने लढत आहे. त्यामुळे मला वाटते, की प्रेमच जिंकेल, असा विश्वासही राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केला.
राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन ठिकाणांवरून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. अमेठी हा गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आहे. भाजपने याही वेळी या मतदारसंघातून स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. 2014 च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना जोरदार लढत दिली होती. याही निवडणुकीत हा सामना लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.