मुंबई: सध्या मुंबईसह महाराष्ट्रात मुलं चोरणारी टोळी (child stealer) सक्रिय झाल्याची अफवा वेगाने पसरत आहे. अफवांमुळे अनेक निरपराध लोकांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशातचं, मुंबईमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं चोरणारी महिला समजून पत्रकार महिलेला जमावाने रेल्वे स्थानकावर घेरल्याचा (woman journalist surrounded by mob) प्रकार कांजुरमार्ग रेल्वे स्थानकावर घडला आहे. या प्रकरणी पुनम पोळ (poonam pol) महिलेने मुंबई रेल्वे (Mumbai Railways) लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद (Railway Commissioner of Police Kaisa khali) यांच्याकडे ऑनलाइन तक्रार (Complain online) देखील केली आहे.
घडलेला प्रकार असा की पूनम विजय पोळ या महिला पत्रकार राहणार सेंट्रल रेल्वे कॉलनी, माटुंगा. त्या 22 सप्टेंबरला कांजूरमार्ग स्थानकावरून रेल्वेची ८.२८ ची गाडी पकडत असताना तेथील काही लोकांनी त्यांना आवाज दिला. पाठीवर जड बॅग आणि हातात अडीच वर्षांची मुलगी सृजन हर्षद साळुंके ही होती. हातातून काहीतरी गहाळ झाले असल्याची शंका आल्याने त्यांनी सदर उपस्थित व्यक्तींना प्रतिसाद दिला. यावेळी तेथील व्यक्तींना काय झाले ? असा प्रश्न केला. यावर त्यांनी पूनम यांस अर्वाच्य भाषा वापरत... मुलगी तुझी नसून चोरली असल्याचा आरोप केला.
यावेळी पूनम यांनी माहेरून परतत असल्याचे सांगितले. तसेच आजीचा मुलीला खूप लळा असल्याने मुलगी रडत असल्याचे सांगितले. हे सांगूनही त्या व्यक्तींच्या शंकेचे निरसन झाले नाही. यावेळी पूनम यांनी मोबाईलमध्ये मुलीचे असलेले फोटो सदर व्यक्तींना दाखवले. परंतु, एकट्या मुलीचा फोटो दाखवत असल्याचा आरोप करून त्यांनी जमाव गोळा करायला सुरुवात केली. या दरम्यान पूनम यांनी तिचे जन्मापासूनचे आत्तापर्यन्त असलेले काही फोटो जमलेल्या जमावाला दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावाला भडकविण्याचा प्रयत्न काही मोजक्या लोकांनी सुरूच ठेवला.
पुनम पोळ म्हणतात की, पूनम पोळ ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या, जमलेल्या जमावाने माझ्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. आवाज करणाऱ्या व्यक्तींमध्ये असलेली महिला मला शिवीगाळ करत होती. तिला मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सदर प्रकरण त्यांच्यासमोर ठेऊन विषयाला पूर्णविराम देऊ, अशी विनंती केली. परंतु ती अज्ञात महिला मात्र रेल्वेगाडीतुन उतरणा-या प्रवाश्यांना जमा करत होती. समोर जमलेला १५० - २०० चा जमाव पाहून मी स्वतःहुन पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदर महिला आणि तेथील दोन पुरुष माझा मोबाईल खेचून घेण्याचा प्रयत्न करत होते.
सारे पुरावे दाखवूनही त्यांनी मला स्थानकामध्ये जमावाच्या मध्यभागी बसवून ठेवले. जमलेल्या जमावामध्ये मी कित्येकांना पोलिसांना फोन करण्याची विनंती करत होते. परंतु अज्ञात चार लोकांनी जमावाला माझ्या विरोधात भडकविण्याचा प्रयत्न केला. मी सातत्याने पोलिसांना बोलवण्याची विनंती करत असताना महिला वर्दी असलेल्या पोलिसांनाच आम्ही ओळखतो, बाकी सारे चोर. हे बोलून जमावाला भडकवत होती. काहीवेळाने रेल्वेचे पोलीस देखील घटना स्थळावर दाखल झाले. मात्र, समोरील अज्ञात व्यक्ती पोलिसांचेही ऐकत नव्हती. यावेळी पोलिस माझी बाजू ऐकत असताना भडकवणाऱ्या अज्ञात लोकांनी पळ काढला.
परंतु, घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर असून त्या चार व्यक्तींनी जमावबंदीच्या माध्यमातून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान माझा मोबाईल सातत्याने खेचण्याचा प्रयत्न या व्यक्तींकडून झाला. तसेच माझ्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्रावर देखील कोणीतरी हात घालत असल्याचे जाणवले. जमलेला जमाव पाहून सदरील प्रकार कोण करत होते. हे माझ्या लक्षात आले नाही. अस पूनम सांगतात.