नागपूर - नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायालयात कार्यरत असलेल्या एका महिला न्यायाधीशाच्या निवासस्थानी चोरी झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. चोरट्याने घरातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईलसह आदी साहित्य असा एकूण एक लाख ७७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून तापस सुरू केला आहे.
एक लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल केला लंपास -
न्यायाधीश गरिमा बागदोडीया या जेएमएफसी नागपूर न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत रवीनगर शासकीय वसाहतीत सरकारी बंगल्यात त्या राहतात. त्या कोर्टात कर्तव्यावर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सरकारी बंगल्याच्या मागच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आरोपीने त्यांच्या बेडरूममधून ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल असा एकूण एक लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. संध्याकाळी पाच वाजता त्या घरी परतल्या असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले. त्यांनी याबाबत लगेच अंबाझरी पोलिसांना सूचना दिली. अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने भेट देऊन चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. अशी माहिती तपास अधिकारी सचिन जाधव यांनी दिली आहे.
अतिसुरक्षित परिसरात आहे निवासस्थान -
न्यायमूर्ती गरिमा बागदोडीया ज्या परिसरात राहतात तो संपूर्ण परिसर अतीसंवेदनशील आहे. इथे अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचे बंगले आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने इथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. त्यामुळेच चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे.