सातारा : साताऱ्यातील वाढे गावच्या हद्दीत वाहन खरेदी-विक्री करणार्या व्यावसायिकाचा एका हॉटेलसमोर गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मृताच्या पोलीस पत्नीनेच सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलांशी अनैतिक संबंध ठेवून पती सतत मारहाण करायचा. या रागातून पत्नीने पतीचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
खूनप्रकरणी पाच जणांना अटक : सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, अलिबाग, इंदूर, उज्जैन (मध्य प्रदेश) अशा वेगवेगळ्या ठिकाणी तपास पथके शोध घेत होती. अखेर संशयित गोव्यात असल्याची माहिती मिळताच उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मदतीने सातारा पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. अभिषेक विलास चतुर (रा. नांदगिरी, ता. कोरेगाव), शुभम हिंदुराव चतुर (रा. कोरेगाव, सध्या रा. पुणे), राजू भीमराव पवार (रा. पंताचा गोट, सातारा), सचिन रमेश चव्हाण (रा. मुळशी, पुणे), सुरज ज्ञानेश्वर कदम (रा. खेड, सातारा, सध्या रा. पुणे), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अमित भोसले सतत त्रास देत होता. त्याचे बाहेर अनैतिक संबंध होते. याच कारणातून पत्नीने हत्येची सुपारी दिल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
मैत्रिणीसोबत नाष्टा केल्यानंतर घातल्या गोळ्या : अमित भोसले (रा. शुक्रवार पेठ, सातारा) हा दि. 24 जानेवारी रोजी रात्री एकच्या सुमारास वाढे गावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये मैत्रिणीसोबत नाष्टा करण्यासाठी आला होता. त्यावेळी मोटरसायकवरून आलेल्या दोघांनी गोळ्या घालून त्याचा खून केला होता. अमित याच्यासोबत महिला असल्याने या घटनेची उलटसुलट चर्चा होती. पोलिसांनी सर्व बाजूने तपास करीत दहा दिवसांनी हल्लेखोरांना जेरबंद केले.
बाहेरख्याली पतीचा काढला काटा : अमित भोसले याचा जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. त्याची पत्नी सातारा पोलीस दलात आहे. पतीचा बाहेरख्यालीपणा आणि मारहाण, या रागातून पोलीस असलेल्या पत्नीने पतीच्या खुनाचा कट रचला. मैत्रिणीसोबत हॉटेलबाहेर नाष्टा करण्यासाठी गेल्यानंतर हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. त्यातून तो पळत सुटला आणि पळताना पडला. यावेळी हल्लेखोरांनी त्याचा गळा चिरून घटनास्थळावरून पलायन केले होते. या घटनेमुळे सातारा शहर हादरून गेले होते.
पोलीस दलात खळबळ : सातारा पोलीस दलात असलेल्या पत्नीनेच पती अमित भोसले याच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाल्यानंतर सातारा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. गेली दहा दिवस वरिष्ठ अधिकारी या गुन्ह्याच्या तपासात गुंतले होते. अनेक बाजूने तपास केल्यानंतर पोलिसांना काही धागेदोरे मिळाले. त्यामुळे या खळबळजनक गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले.