कामारेड्डी (तेलंगणा) : तेलंगणाच्या कामारेड्डी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलाने आपल्या दोघा जुळ्या मुलींना चक्क पैशांसाठी विकले. वडिलाने या जुळ्या मुली ज्यांना विकल्या त्यांनी त्या मुलींशी लग्न केले व त्यांच्यावर अनेक प्रकारे अत्याचार केले. यांपैकी एक मुलगी त्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली व तिने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मुलींनी लहानपणीच आई गमावली : मुलीने सांगितले की, तिच्या बहिणीला देखील अशाच प्रकारे विकल्या गेले आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुलीशी लग्न करणाऱ्यासह सात जणांना अटक करून पोलीस कोठडी सुनावली आहे. एसपी श्रीनिवास रेड्डी यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या संदर्भात तपशील उघड केला आहे. या दोन मुलींनी लहानपणीच आपली आई गमावली होती. त्यानंतर त्यांच्या वडीलाने दुसरे लग्न केले. त्याला दुसऱ्या पत्नीकडून एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मात्र त्याला या चार मुलांचे पालनपोषण करणे अवजड जात होते त्यामुळे त्याने या दोन मुलींना विकायचा निर्णय घेतला.
पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल : वडिलाने ही गोष्ट आपल्या ओळखीच्या नातेवाईकाला सांगितल्यावर त्यांनी त्याची ओळख राजस्थानमधील एका व्यक्तीची करून दिली. जुळ्या मुलांपैकी धाकटीला 80 हजार रुपयांना विकत घेण्यात आले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तो तिला हैदराबादला घेऊन गेला आणि तिथे तिचे लग्न लावले. त्यानंतर त्याने मुलीला त्याच्या मूळ गावी दांडुपल्ली येथे नेऊन तिच्यावर शारिरीक अत्याचार केला. तो आधीच विवाहित असून त्याला दोन मुले आहेत तसेच त्याचे अनेक विवाहबाह्य संबंध आहेत. त्यानंतर ती मुलगी तिथून पळून गेली आणि कामरेड्डीला पोहोचली. तिथे तिने बाल संरक्षण अधिकारी (डीसीपीओ) स्रावंती यांची भेट घेतली. तिने सांगितले की तिच्या बहिणीला देखील सिकंदराबादच्या बोईनापल्ली येथे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 50 हजार रुपयांना विकले होते. डीसीपीओच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मुलींचे वडील, सावत्र आई आणि मुलींशी लग्न केलेले आरोपी यांच्या विरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच जे या विक्रीत मध्यस्थ म्हणून काम करतात त्यांना रिमांडवर घेतले गेले आहे.
हेही वाचा : Kidnapping News : खळबळजनक! दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण ; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद