मुंबई - शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिक महिलेवर तक्रार करूनही काहीही कारवाई न केल्याप्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक फटांगरे, बांगलादेशी महिला रेश्मा खान (FIR Against Bangladeshi Woman Reshma Khan) यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसात (Malvani Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास आता गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपविण्यात आला आहे. देवेन भारती यांच्या आदेशावरून रेश्मावर गुन्हा दाखल झाला नव्हता, असा आरोप तक्रारदार माजी पोलीस निरीक्षक दिपक कुरुळकर (Ex PI Deepak Kurulkar) यांनी केला आहे. या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला असला तरी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला आहे.
पोलिसांनी केली होती चौकशी
चार वर्षांपूर्वी दिपक कुरुळकर हे गुन्हे शाखेच्या आय शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी रेश्मा खानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडे पोलिसांना एक पासपोर्ट सापडला होता. या पासपोर्टसाठी तिने सादर केलेले सर्व कागदपत्रे बोगस (Fake Documents For Passport) होती. ती बांगलादेशी नागरिक (Bangladeshi Citizen) होती, तरीही तिने भारतीय नागरिक असल्याचे बोगस पुरावे गोळा केले होते. तिच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केल्यानंतर दिपक कुरुळकर यांनी मालवणी पोलिसांना गुन्हा करून तिच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची विनंती केली होती. यावेळी दिपक फटांगरे हे मालवणी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
तक्रारीनंतरही कारवाई नाही
या तक्रारीनंतरही दिपक फटांगरे यांनी काहीही कारवाई केली नव्हती. काही दिवसांनी त्यांनी मालवणी पोलिसांकडे चौकशी करून त्यांच्या अर्जानंतर रेश्माविरुद्ध काय कारवाई झाली याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांना वरिष्ठांच्या आदेशावरून ही कारवाई झाली नसल्याचे समजले. अधिक चौकशीअंती त्यांना, त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख असलेले सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनीच मालवणी पोलिसांना तसे आदेश दिल्याचे समजले होते. आय शाखेत कार्यरत असताना त्यांना देवेन भारती यांनी बोलावून 'या प्रकरणात जास्त लक्ष घालू नकोस', असेही बजाविले होते.